निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन
पी. बी. सावंत यांचं आज (सोमवार) सकाळी साडेनऊ वाजता निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ( P B Sawant Dies)
पुणे : निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं निधन झालं. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील पहिली एल्गार परिषद पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. (Retired Justice P B Sawant Dies in Pune)
पी. बी. सावंत यांचं आज (सोमवार 15 फेब्रुवारी) सकाळी साडेनऊ वाजता निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी पुण्यातील बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पी. बी. सावंत यांची अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती म्हणून ओळख होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचा निकाल लागला.
पी. बी. सावंत यांची कारकीर्द
पी. बी. सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एलएलबी) मिळवल्यानंतर पी. बी. सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली म्हणून सराव सुरु केला. 1973 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली; त्याच्या उल्लेखनीय कामांपैकी एक म्हणजे जून 1982 मधील एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी. 1989 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आले. 1995 मध्ये ते निवृत्त झाले.
पी. बी. सावंत यांच्या नेतृत्वात आयोग
एक सप्टेंबर 2003 रोजी तत्कालीन महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाचे पी. बी. सावंत अध्यक्ष होते. त्यांनी 23 फेब्रुवारी 2005 रोजी आपला अहवाल सादर केला, ज्यात नवाब मलिक, पद्मसिंह पाटील आणि सुरेश जैन यांच्यावर आरोप होते, परंतु विजयकुमार गावित यांना दोषमुक्त केले गेले. यामुळे दोन कॅबिनेट मंत्री सुरेश जैन आणि नवाब मलिक यांनी राजीनामा दिला.