पुण्यात सहावी ते आठवीपर्यंतचे शालेय वर्ग सुरु करण्याची तयारी
Pune Schools | या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा समितीची येत्या शुक्रवारी 13 ऑगस्टला बैठक बोलवली आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) स्मिता गौड आणि अन्य काही शिक्षणतज्ज्ञांचा या समितीत समावेश आहे.
पुणे: राज्यातील कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या 17 ऑगस्टपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या भागांमध्ये टप्याटप्प्याने शाळा (School) सुरु केल्या जातील. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातही सहावी ते आठवीपर्यंतचे शालेय वर्ग सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
त्यासाठी सध्या मार्गदर्शक सुचनांची नियमावली तयार केली जाणार आहे. ही नियमावली निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा समितीची येत्या शुक्रवारी 13 ऑगस्टला बैठक बोलवली आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) स्मिता गौड आणि अन्य काही शिक्षणतज्ज्ञांचा या समितीत समावेश आहे.
या बैठकीत शाळा सुरु करताना शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी, ग्रामपंचायत आणि शालेय व्यवस्थापन समित्यांनी काय करावे, याबाबतची मार्गदर्शक नियमावलीवर चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.
पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आज
कोरोना संसर्गामुळे याआधी सात वेळा लांबणीवर पडलेली मागील शैक्षणिक वर्षातील इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आज होणार आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून एकूण 449 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होईल. यापैकी 290 परीक्षा केंद्र हे पाचवीसाठी तर, 159 परीक्षा केंद्र हे आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी निश्चित करण्यात आली आहेत. शहर व जिल्ह्यातील मिळून 52345 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
17 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील 5 वी ते 7 इयत्तेचे वर्ग सुरु होणार
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील शाळा सुर करण्यासंदर्भात मोठा निर्णय काही दिवासांपूर्वी जाहीर केला होता. 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील कोरोना संसर्ग कमी झालेल्या भागातील निर्बंध शिथील केल्यानंतर सरकारचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.
राज्यातील ग्रामीण भागात दि .17 ऑगस्ट 2021 पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या:
राज, उद्धव यांचं सांगू नका, माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो, बच्चू कडूंचं रोखठोक उत्तर
8 महिने काबाड कष्ट करुन 30 हजार मासे वाढवले, इंदापुरात एका रात्रीत सर्व माशांचा मृत्यू, कारण काय?