Rupali Patil : पुन्हा मंत्रीपदापासून पानटपरीवर चुना लावायला बसावं लागेल, गुलाबराव पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्याचा रुपाली पाटलांकडून समाचार
काय उदाहरण देताय, काय आदर्श ठेवताय, अक्षरश: लाजीरवाणी गोष्ट आहे. अशी अडाणी माणसे घेऊन तुम्ही महाराष्ट्र चालवणार आहात का, असा सवाल रुपाली पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.
पुणे : पानटपरी ते मंत्री असा जो गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा प्रवास आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या बुद्धीचा विकास झालेला दिसत नाही, असा खोचक टोला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात महिलांसंबधी वादग्रस्त वक्तव्य केले होते. स्त्री रोग तज्ज्ञ कधीच महिलांचे हात-पाय पाहत नाही, असे म्हणत त्यांनी वाद निर्माण केला आहे. याचा विविध स्तरातून विरोध होत आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या रुपाली पाटील यांनीदेखील गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे. कुठल्या कार्यक्रमात काय बोलावे याचे भानदेखील या नेत्यांना नाही, अक्षरश: लाज वाटते, असे रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.
‘या गद्दारांना कोणतेही धोरण नाही’
मंत्री गुलाबराव पाटील हे मुळात पानाला चुना लावणारे आहेत. कुठलाही व्यवसाय वाईट नसतो. परंतू पानटपरी ते मंत्री असा प्रवास केलेल्या गुलाबराव पाटील यांच्या बुद्धीचा विकास झालेला दिसत नाही. आपण कोणत्या कार्यक्रमात कुठले उदाहरण देत आहोत, याचे भान मंत्र्यांनी ठेवले पाहिजे. मात्र या गद्दारांना कोणतेही धोरण नाही. स्त्री-रोग तज्ज्ञ हातपाय नको बघू देत. पण येणाऱ्या काळात तुम्हाला परत मंत्रीपासून ते पानटपरीवर चुना लावायला बसावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
एकनाथ शिंदेंना सवाल
काय उदाहरण देताय, काय आदर्श ठेवताय, अक्षरश: लाजीरवाणी गोष्ट आहे. अशी अडाणी माणसे घेऊन तुम्ही महाराष्ट्र चालवणार आहात का, असा सवालदेखील रुपाली पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. हे लोक सतत आपल्या वाक्यातून, कृतीतून सतत महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. अशा लोकांपासून खरेच महाराष्ट्र वाचवण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?
मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही. डॉक्टरांचे डोके एका फॅकल्टीचे असते. मात्र आम्ही जनरल फिजिशियन आहोत. बायको नांदत नाही, तो पण माणूस आमच्याकडे येतो असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.