रवी भाऊ… अजितदादा महायुतीत आहेत हा तुमचा… रुपाली ठोंबरे यांची खरमरीत पोस्ट; धंगेकरांना उत्तर काय?
काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजितदादांना देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत राब राब राबवून घेतलं. त्यांना खूप पळवलं, अशी खोचक टीका रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. त्याला राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा पवार यांना या निवडणुकीत हायपाय बांधून पळायला लावलं, अशी खोचक टीका काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांन केली होती. धंगेकर यांच्या या टीकेचा रुपाली पाटील ठोंबरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अजितदादा महायुतीत आहेत. त्यांचं व्यवस्थित सुरू आहे. महायुतीतील तिन्ही नेत्यांचा चांगला समन्वय आहे. त्यामुळेच तुम्हाला त्रास होत आहे, अशी खोचक टीका रुपाली ठोंबरे यांनी धंगेकर यांच्यावर केली आहे. ठोंबरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून ही टीका केली आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट जशीच्या तशी…
आमदार रवी भाऊ धंगेकर, फडवणीस साहेबांनी अजितदादांचे हातपाय बांधले, असे तुम्ही बोलून गेलात. पण तुम्हाला आठवण करून दयायची आहे, हे तेच अजितदादा आहेत, जे महविकास आघाडीमध्ये असताना ज्यांनी तुमच्या आमदारकीचा हात पाय झटकून, तन, मन, धनाने जोरात काम केले, आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना जोमात काम करायला सांगितले. अजितदादा सुशिक्षित आहेत. त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. ते कर्तव्यदक्ष नेते आहेत. आता दादा महायुतीत आहे हा तुमचा त्रास आहे. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री फडवणीस साहेब आहेत आणि दादा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत.
पुण्यात ज्या अल्पवयीन मुलाकडून नशापणी करत अपघात घडला, त्यात दोन तरुण मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला. भयाण आणि धक्कादायक घटनेने पुणे हादरले. त्यात खुद्द त्या खात्याच्या प्रमुखाने, गृहमंत्री यांनी पोलीस आयुक्तालय इथे येवून कडक कारवाईचे आदेश दिले. कर्तव्यात कसूर केलेल्या पोलिसांचे निलंबन केले. महायुतीचे सरकार असल्याने अजितदादा आणि फडवणीस साहेब यांच्यातील समन्वय, संवाद एकत्र काम करण्याची दोघांची शैली तुम्ही पाहताय. याचा जास्त वेदना होत आहेत याची जाणीव आहे आम्हाला. गृहमंत्र्यांनी कारवाई आदेश दिले म्हणजे पालकमंत्र्यांशी चर्चा करूनच एकत्रित निर्णय केलेला असतो. तो भाऊ तुम्हाला समजत नसेल किंवा समजून सुद्धा फक्त विरोधक आहात म्हणून घडलेली घटना गुन्हा, केस न समजता विरोधक म्हणूनच टीका करत आहात.
जरा आपले पुणे, आपली युवा पिढी,चांगले लोकप्रतिनिधी बनून पुणे वाचवू या आणि घडवू या. नुसते राजकीय स्टंट नकोत.त्यामुळे कामाची दिशा भरकट जाते. रवी भाऊ तुम्ही केलेल्या विधानाचा जाहीर निषेधच.