Shivsena : ‘…तर संविधानातल्या तरतुदींनुसार कारवाई होणार’; शिवसेनेच्या पुण्यातल्या मेळाव्यात सचिन अहिर यांचा बंडखोरांना इशारा
बंडखोर आमदार त्यातही नुकतेच गुवाहाटीला गेलेले आमदार उदय सामंत यांच्याविषयी ते म्हणाले, की उदय सामंत अजून तेथे पोहोचले नाहीत, अशी माझी माहिती आहे. मात्र कालपर्यंत जिवाभावाचे लोक सोबत होते. पण आज तेच निघून जाताना दुःख होत आहे.
पुणे : काही लोक मीडियात चुकीची माहिती पसरवत आहेत. जे लोक समज गैरसमज पसरवत आहेत की आम्ही शिवसेनेत (Shivsena) आहोत, आम्ही कधी पक्ष सोडला आहे आणि हीच मंडळी आता सुरू असलेली पंढरीची वारी सोडून सुरत आणि गुवाहाटीला गेले आहेत, अशी टीका शिवसेना नेते आणि संपर्कप्रमुख सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी केली आहे. शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पक्षविरोधी कायवाया केल्या तर घटनेनुसार कारवाई होणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, या मेळाव्यानंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले स्मारकात हा मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्याच्या ठिकाणी सभागृहाबाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या मेळाव्याला सचिन अहिर यांनी मार्गदर्शन केले.
‘…तर कारवाई होऊ शकते’
बंडखोर आमदार त्यातही नुकतेच गुवाहाटीला गेलेले आमदार उदय सामंत यांच्याविषयी ते म्हणाले, की उदय सामंत अजून तेथे पोहोचले नाहीत, अशी माझी माहिती आहे. मात्र कालपर्यंत जिवाभावाचे लोक सोबत होते. पण आज तेच निघून जाताना दुःख होत आहे. त्यांना चुकीची माहिती दिली गेली आहे. मात्र त्यांना त्यांची चूक नक्की लक्षात येईल, असा आशावाद सचिन अहिर यांनी व्यक्त केला आहे. पार्टीच्या विरोधात तुम्ही काम केले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे संविधानात सांगितले आहे, याची आठवण यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना करून दिली.
‘वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न’
सचिन अहिर पुढे म्हणाले, की विभागनिहाय मिळावे घेण्याची विनंती कार्यकर्त्यांकडून होत होती. पुणे जिल्ह्याचा संपर्कप्रमुख म्हणून मी स्वतः आपल्या जिल्ह्यात मेळावे घेणार आहे. आजपासून लोकसभानिहाय मेळावे घेण्याची सुरुवात आम्ही करत आहोत. पहिला मेळावा आज होत आहे. मेळाव्यात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. जी वस्तुस्थिती आज राज्यात आहे, ती मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले.