Sambhaji Bidi | संभाजी बिडीचं नाव बदललं, नवं नाव काय?
साबळे वाघिरे कंपनीने चार महिन्यांपूर्वी संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता.
पुणे : साबळे वाघिरे कंपनीने चार महिन्यांपूर्वी संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. संभाजी बिडीचे (Sambhaji Bidi) नाव बदलावे या मागणीसाठी अनेक वर्षांपासून संभाजी ब्रिगेड, अनेक शिवप्रेमी संघटना आणि काही राजकीय संघटना प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी ही मागणी घेऊन आंदोलनही करण्यात आले होते. त्यांच्या या आंदोलनाला यश आले आहे. (Sambhaji Bidi’s name changed as a Sable bidi)
साबळे वाघिरे आणि कंपनीने संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नाव बदलण्यास थोडा वेळ लागेल असे कंपनीकडून सांगण्यात आले होते. आता कंपनीने बिडीचे नाव बदलले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विकली जाणारी बिडी आता ‘साबळे बिडी’ या नावाने विकली जाणार आहे. संभाजी ब्रिगेड, शिवधर्म फाऊंडेशन, इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करुन आम्ही बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे साबळे वाघिरे आणि कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले होते.
यापुढे कोणीही महापुरुषांच्या नावांचा गैरवापर करु नये : संभाजी ब्रिगेड
“संभाजी बिडी’ विरोधात अकरा-बारा वर्षापासूनच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. महापुरुषांच्या नावाचा यापुढे कोणीही गैरवापर करू नये, तसे केल्यास संभाजी ब्रिगेड ते खपवून घेणार नाही”, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी दिला आहे.
शिवप्रेमींच्या लढ्याचा विजय : शिवधर्म फाऊंडेशन
शिवधर्म फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे याबाबत म्हणाले की, संभाजी बिडी या नावामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान होत असल्याचा आक्षेप घेत शिवप्रेमींनी याबद्दल आंदोलन केलं होतं. शिवधर्म फाऊंडेशनच्या माध्यमातून पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आमरण उपोषणही करण्यात आलं होतं. त्यानंतर साबळे-वाघिरे कंपनीने या बिडीच्या नावात बदल करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार या बिडीचं साबळे बिडी असं नामकरण करण्यात आलं आहे. हा समस्त शिवप्रेमींच्या लढ्याचा विजय आहे.
अनेक वर्षांपासूनचा लढा
छत्रपती संभाजी महाराजांचं नाव अशा पद्धतीने वापरलं जाऊ नये, यासाठी संभाजी ब्रिगेडने अनेक वर्षापासून हा विषय लावून धरला होता. गेल्या वर्षी कोल्हापुरातही संभाजी बिडीविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. राज्यातील अनेक ठिकाणी हे आंदोलन पाहायला मिळालं होतं. या आंदोलनानंतर आता साबळे वाघिरे कंपनीने संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नाव बदलण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचे कंपनीने म्हटलं होतं. आता अखेर बिडीचं नाव बदलण्यात आलं आहे.
साबळे वाघिरे आणि कंपनी त्यांच्या उत्पादनासाठी नवीन नाव कायदेशीर प्रक्रियेने नोंदवणार आहे, असे काही महिन्यांपूर्वी एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले होते. कंपनीने म्हटले होते की, नाव बदलण्यास थोडा वेळ दिला जावा, जेणेकरुन नवं नाव नोंदवता येईल, नवं नाव लोकांपर्यंत पोहोचवता येईल. तसेच आमच्या ग्राहकांची साखळीही तुटणार नाही, शिवप्रेमींची मागणीही पूर्ण होईल आणि 60 ते 70 हजार विडी कामगारांच्या प्रपंचावर कुऱ्हाडही येणार नाही.
हेही वाचा
Sambhaji Bidi | शिव-शंभूप्रेमींच्या लढ्याला यश, संभाजी बिडीचं नाव बदलणार, कंपनीचा निर्णय
(Sambhaji Bidi’s name changed as a Sable bidi)