पुणे: कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याकरिता अवघे दोन तास उरले आहेत. त्यामुळे पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीतून संभाजी ब्रिगेडने माघार घेतली आहे. कसबा पेठ आणि चिंचवडमधील संभाजी ब्रिगेडचे दोन्ही उमेदवार अर्ज मागे घेणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार सचिन अहिर यांच्या शिष्टाईनंतर अखेर संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यास होकार दर्शविला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे.
कसबापेठमधून संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते आणि चिंचवडमधून प्रवीण कदम उभे होते. या दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचारही सुरू केला होता. संभाजी ब्रिगेड हा ठाकरे गटाचा मित्र पक्ष असतानाही त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आघाडीचं टेन्शन वाढलं होतं.
आज सकाळी अजित पवार यांनी संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांशी चर्चा केली. त्यानंतर सचिन अहिर यांनी या उमेदवारांची भेट घेतली. संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांशीही चर्चा केली. या नेत्यांची उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करून देण्यात आली. त्यानंतर संभाजी ब्रिगेडने या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मतांची विभागणीही टळणार आहे.
दरम्यान, हिंदू मतांमध्ये फूट पडू नये म्हणून भाजपनेही हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी अर्ज मागे घ्यावेत म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. दवे यांनी उमेदवारी कायम ठेवल्यास त्याचा फटका भाजपलाच बसणार आहे. त्यामुळे भाजपने दवे यांची मनधरणी सुरू केली आहे.
दुसरीकडे चिंचवडचे महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी अद्याप कोणताही निर्णय जाहीर केला नाही. राहुल कलाटे अजूनही निवडणुकीच्या मैदानात आहेत. कलाटे यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांनीही कलाटे यांच्याशी चर्चा केली.
तर सचिन अहिर यांनी चिंचवडमध्ये येऊन त्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, कलाटे यांनी अर्ज मागे घेण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच ते निर्णय घेणार आहेत. कोणत्याही क्षणी कलाटे आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचा अनादर करायचा नाही, असं सूचक विधान कलाटे यांनी केल्याने ते उमेदवारी अर्ज मागे घेतील असं सांगितलं जात आहे.