Pune Raj Thackeray : आधी निषेध करा मगच बोला, प्रवीण गायकवाडांचं राज ठाकरेंना अल्टीमेटम, जेम्स लेन प्रकरण पुण्यात पुन्हा केंद्रस्थानी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आधी जेम्स लेनप्रकरणाचा (James Laine) निषेध नोंदवावा मगच या वादाप्रकरणी बोलावे, असा टोला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी पुण्यात लगावला आहे.
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आधी जेम्स लेनप्रकरणाचा (James Laine) निषेध नोंदवावा मगच या वादाप्रकरणी बोलावे, असा टोला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी पुण्यात लगावला आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा तसेच ठाण्यातील उत्तर सभेत राष्ट्रवादी तसेच शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका केली होती. त्यावर प्रवीण गायकवाड यांनी आपले मत नोंदवले आहे. ते म्हणाले, जेम्स लेनप्रकरणी राज ठाकरे यांनी निषेधदेखील नोंदवलेला नाही. त्यामुळे त्यांना याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. राज ठाकरे यांनी जेम्स लेनचा विरोध किंवा निषेध केला नाही. बाबासाहेब पुरंदरे यांनीही जेम्स लेनचा निषेध केला नाही. मग 18 वर्षांनंतर राज ठाकरे यांनी सभेत हा मुद्दा उकरून काढण्यामागे काय डाव आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
संभाजी ब्रिगेडने घेतली होती आक्रमक भूमिका
जेम्स लेनच्या ‘शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर होता. सामाजिक भावना दुखावल्यामुळे राज्य सरकारने 2004मध्ये या पुस्तकावर बंदी घातली. उच्च न्यायालयानेही पुस्तकावर बंदी कायम ठेवली. परंतु, सर्वोच्च न्यायालयात या पुस्तकावरील बंदी उठण्यात आली. उच्च न्यायालयात बंदी असतानाही पुस्तक विक्री सुरू होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली होती.
शरद पवारांवरील टीका व्यर्थ
शरद पवार यांनी सर्व जाती-धर्माच्या नेत्यांचा मंत्रिमंडळात स्थान दिले. गेल्या 50 वर्षांत त्यांना कोणी जातीयवादी म्हटले नाही. पवार हे महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे बदनामी करून त्यांची आणि आघाडी सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव आहे. तसेच, मशिदीवरील भोंग्यांना विरोध करून धार्मिक तेढ निर्माण करणे हे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.