प्रकाश आंबेडकर आणि संभाजी राजे यांची युती नाहीच?; संभाजी राजे स्पष्टच म्हणाले, औरंगजेबाच्या…
मला 50 किल्ले दत्तक द्या. आम्ही किल्ल्यांचं संवर्धन करू. रायगड मॉडलप्रमाणे किल्ल्यांचं संवर्धन करू, असं माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी सांगितलं.
पुणे : माजी खासदार छत्रपती संभाजी राजे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठी वाढल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकांशी राजकीय, सामाजिक विषयावर तास न् तास गप्पाही मारल्या आहे. छत्रपती घराणं आणि आंबेडकर घराणं एकत्र आलं तर राज्यात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तन होईल, असं दोघांनी म्हटलं आहे. तसेच दोघांनी एकत्र येणार असल्याचे संकेतही दिले होते. त्यामुळे राज्यात दोन घराण्याची ऐतिहासिक युती होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता ही चर्चा केवळ चर्चाच राहण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या एका कृत्यामुळे या युतीची शक्यता धुसर झाली आहे. तसं सुतोवाचच संभाजीराजेंनी केलं आहे.
संभाजीराजे हे पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्याबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकरांच्या कृतीचं समर्थन कसं करणार? प्रकाश आंबेडकरांसोबत जाणार नाही. मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. या पलिकडे अजून काय बोलणार?, असा सवाल संभाजी राजेंनी केला.
अभिवादनच करायचं तर…
मी माझी भूमिका काल स्पष्ट केली आहे. ज्या शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करताना औरंगजेबाने ठार मारण्याचा प्रयत्न केला, ज्या संभाजी महाराजांची हत्या केली, ज्या ताराराणींनी सात वर्ष औरंगजेबाशी लढा दिला, अशा औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याची गरज काय?
तुम्हाला अभिवादन करायचं असेल तर शिवाजी महाराजांच्या समाधीला जाऊन अभिवादन करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाडला गेले होते. तिथे गेल्यावर ते न चुकता रायगडावर गेले. तिथे झुडपं होतं, समाधीच्या ठिकाणी पोहोचण्याची अडचण होती. पण बाबासाहेब गेले आणि त्यांनी त्यांना अभिवादन केलं, असंही संभाजीराजे म्हणाले.
शाहू महाराजच रोल मॉडल
देशच नाही तर राज्यातील कोणत्याही नेत्याला शाहू महाराजांना बाजूला ठेवून राजकारण करता येणार नाही. शाहू महाराज हेच तुमचे रोल मॉडल होऊ शकते. त्यांना रोल मॉडल ठेवूनच राजकारण करावं लागेल, असं संभाजी राजेंनी सांगितलं. मी खासदार असातना आम्ही शाहू महाराजांची जयंती साजरी केली. शाहू महाराजांची जयंती संसदेत सुरू करण्याचं भाग्य मला मिळालं होतं, असंही त्यांनी सांगितलं.