‘पुण्यात सत्ता असून नसल्यासारखं’, संजय काकडे यांचा पालकमंत्र्यांसमोर भाजपला घरचा आहेर
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवरुन भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा सातत्याने समोर येत असतात. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होताच पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली. त्यानंतर या प्रकरणाचा पुढचा अंक आज भाजपच्या पुण्यातील कार्यक्रमात बघायला मिळाला.
पुणे | 29 जुलै 2023 : भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक दिग्गज नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी भाजपचे फक्त 30 ते 32 नगरसेवक उपस्थित होते. यावरुन भाजप नेते संजय काकडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी पालकमंत्र्यांसमोर भाजपला घरचा आहेर दिला. विशेष म्हणजे पुण्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. राज्यातील राजकीय घडामोडींचा परिणाम पुणे भाजपमध्ये बघायला मिळतोय.
“आजच्या कार्यक्रमाला फक्त 30 ते 32 नगरसेवक आहेत. सगळे नगरसेवक का येत नाहीत? शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आता विचारले पाहिजे. शहरातील नगरसेवकांची काम होत नाहीत. जर काम होत नसतील तर निवडून कसं येणार? 10 वेळा कामासाठी जावं लागतं. अधिकाऱ्यांकडून हेटाळणी केली जातीये. आपल्या नगरसेवकांची कामे झाली पाहिजेत. त्याची जबाबदारी ही धीरज घाटेंची आहे”, असं संजय काकडे म्हणाले.
‘सत्ता असून नसल्यासारखं आहे’, काकडे यांचा भाजपला घरचा आहेर
“महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या बदलीची मागणी थेट पालकमंत्र्यांसमोर करण्यात आली. आयुक्तच बदला नाहीतर आयुक्तांकडून कामं करून घ्या. नगरसेवकांचीच काम होत नसतील तर सत्ता असून नसल्यासारखे असेल”, असं रोखठोक मत मांडत संजय काकडे यांनी भाजप पक्षाला घरचा आहेर दिला.
‘संजय काकडे यांनी कधी कधी आई बनावे’, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
संजय काकडे यांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “संजय काकडे हे कधी कधी स्पष्ट बोलतात. नाना हे बाबांचा रोल बजावतात. ते चिमटा काढतात. एखाद्या मुलाचं काही चुकलं तर त्याची आई त्याला प्रेमानं समजावून सांगते. पण वडील एखादा धपाटा घालतात. मांजर जशी पिलाला तोंडात उचलते तेव्हा पिलांना दात लागू देत नाही, संजय काकडे तसे आहेत. पण त्यांनी कधी कधी आई पण बनावे”, अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिली. “कोणाबरोबर युती, किती जागा याची अजिबात काळजी करू नका. महाराष्ट्रात देवेंद्र नावाचं असं व्यक्तिमत्त्व उभं राहिलं की भल्या भल्यांना गप्प केलं. ज्यांना वाटत नव्हते ते केलं. देवेंद्र फडणवीस आता ठरवतील. एकनाथ शिंदे आणि अजित पवार आल्यानंतर काय होणार? याची काळजी करू नका. देवेंद्र फडणवीस ठरवतील काय करायचं. चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले आहे की, आपल्या 152 पेक्षा जास्त जागा येतील”, असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केलं.