Exclusive : देशात किती ठिकाणी एकास एक उमेदवार?, आघाडीचा जिंकण्याचा फॉर्म्युला काय?; संजय राऊत यांनी सांगितली आतली बातमी !
भाजपनेच संवाद दौरा ठेवला पाहिजे असं नाही. आमचाही संवाद कायम असतो. फक्त आम्ही सरकारी खर्चाने ढोंग करत नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना धमक्या देऊन कामाला लावत नाही. सरकारी खर्चाने मंडप टाकायचे हे आम्ही करत नाही.
सातारा : लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणूक जवळ आल्या आहेत. या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. विरोधकांनी देश पातळीवर आणि राज्य पातळीवर रणनीती आखली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. मात्र, देशात किती ठिकाणी एकास एक उमेदवार दिले जाणार आहेत, याची आतली माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातील जागा वाटपाचा आणि निवडणुका जिंकण्याचा फॉर्म्युला काय असेल? याची एक्सक्लूझिव्ह माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी आतली बातमी दिली. लोकसभेच्या संदर्भात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते बसून चर्चा करत आहेत. चर्चा सुरू आहे. जो खात्रीने जिंकू शकेल त्याला सीट सोडण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला या महाराष्ट्रात डोकं वर काढू द्यायचं नाही. हा जो विषारी फणा आहे. तो ठेचायचा, यावर आमचं तिन्ही पक्षाचं एकमत झालं आहे. पाटण्यातही एकमत झालं आहे. आमच्यात मतभेद नाही. एखाद दुसऱ्या जागेवरून खेचाखेची होईल असं नाही. आमची तिन्ही पक्षाची जागांसाठी त्याग करण्याची तयारी आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
त्यांना देश कळतोय का?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या बैठकीवर टीका केली आहे. बावनकुळे यांच्या या टीकेचा राऊत यांनी समाचार घेतला. बावनकुळे हे झोपेत आहेत. अजून त्यांनी नीट डोळे उघडले नाहीत. त्यांचा चेहरा नीट पाहा. आताच झोपेतून उठलेत असं तुम्हाला कायम दिसेल किंवा पापण्या हलवत आहेत, असं दिसेल. अशा माणसाकडून काय अपेक्षा करत आहात? त्यांना काय देश कळतोय? विधानसभेत त्यांना तिकीट नाकारलं होतं. अनेक काळ ते वनवासात होते. त्या धक्क्यातून ते सावरलेत का माहीत नाही, असा चिमटा राऊत यांनी बावनकुळे यांना काढला.
450 जागांवर एकास एक उमेदवार
2019 ची परिस्थिती वेगळी होती. आता वेगळी आहे. एकास एक उमेदवार आम्ही देणार आहोत. किमान 450 जागांवर एकास एक उमेदवार आम्ही देणार आहोत. आम्ही फक्त घोषणा केली एकत्र येतोय असं म्हटल्यावर भाजपने त्यांच्या 100 जागा कमी केल्या. चार दिवसांपूर्वी आपकी बार भाजप, चारसौ पार, असं भाजपकडून सांगितलं जात होतं. काल अमित शाह यांचं स्टेटमेंट पाहा. 300 जागा जिंकू, असं शाह म्हणाले. नुसतं आम्ही एकत्र फोटो काढला तर त्यांच्या 100 जागा कमी झाल्या, असा चिमटा त्यांनी काढला.