पुणे : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) प्रस्थान सोहळ्याची रूपरेषा तयार झाली आहे. पहाटे 4 पासून प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल. घंटानाद, काकडा यासह विविध धार्मिक विधी पार पाडले जातील. दुपारी अडीचला 47 दिंड्या मंदिरात येणार असून 4च्या सुमाराला पालखी प्रस्थान होणार आहे, अशी माहिती व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर (Dnyaneshwar Veer) यांनी दिली आहे. 21 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या आळंदीत लगबग सुरू झाली आहे. वारी 9 जुलैला पंढरपुरात (Pandharpur) पोहोचणार आहे. आषाढी एकादशी 10 जुलैला आहे. दरम्यान, या सोहळ्यानिमित्त आळंदीत वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. आळंदी संस्थानासोबतच वारकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. 21 जूनच्या प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर आळंदीमध्ये माऊलीच्या रथाची चाचणीही नुकतीच घेण्यात आली होती.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग गेले काही दिवस आळंदी मध्ये पाहायला मिळत आहे. या तयारीमधील एक मुख्य भाग म्हणजे पालखी रथाबरोबर जाताना माऊलींच्या आरतीचे सामान, चांदीचे दागिने, वस्त्र या सर्वाचे व्यवस्थापन… ते व्यवस्थापन पूर्ण झाले आहे. पालखीबरोबर मंदिर समितीचे जवळपास 300 लोक असतात. त्यांच्यासाठी अगदी सुईपासून तंबू, जेवण आणि संपूर्ण साहित्याची तयारी करण्यात आली आहे.
संस्थानातर्फे गॅस शेगडी, सुईधागे यासह स्वयंपाकासाठीची जी मोठमोठी भांडी आहेत, त्याची जमवाजमव सुरू करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून ही तयारी सुरू करण्यात आल्याचे व्यवस्थापक श्रीधर नाईक यांनी सांगितले. तर घरोघरी ज्ञानेश्वरी पोहोचावी, म्हणून केवळ 80 रुपयांत ती देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास सर्वच तयारी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
श्रींच्या रथापुढील 27 आणि रथामागील 20 अशा 47 दिंड्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी चारपासून प्रस्थान सोहळा सुरू होणार असून मानकरी, सेवेकरी आणि दिंडी प्रमुख यांचा सन्मान होऊन सहा-साडेसहापर्यंत पालखीचे प्रस्थान होईल, असे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले. दोन डोस घेतलेल्या वारकऱ्यांनीच वारीत सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.