पुणे : मृताचा अंतिम अहवाल देण्यासाठी पोलिसांकडेच लाच (Bribe) मागितल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील शासकीय रुग्णालय असलेल्या ससून हॉस्पिटलमध्ये (Sasoon Hospital) हा प्रकार घडला आहे. न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एन. पी. झंझाड असे लाच मागणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. पुणे पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने या प्रकाराला वाचा फोडली आहे. मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डॉ. झंझाड यांनी मृत व्यक्तीचा मृत्यूचा अंतिम अहवाल देण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती आणि 5 हजार रुपये दिल्यानंतर अंतिम अहवाल दिला होता. दरम्यान, डॉ. झंझाड यांनी यापूर्वीही अनेकवेळा अशी लाचेची मागणी केल्याचे पोलिसांचे (Pune Police) म्हणणे आहे. झंझाड हे नेहमीच अहवाल देण्यापूर्वी काहीतरी कारण सांगून लाच मागतात, असे पोलिसांनी सांगितले आहे.
एका 29 वर्षीय तरुणाचा मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी डॉ. झंझाड यांनी लाचेची मागणी केली. डोक्याच्या आत झालेल्या जखमा असे कारण दिले. आता हे कारण दिले तर विलंब आणि खुनाचा गुन्हा दाखल करावा लागेल, त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने संबंधित मृत व्यक्ती दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्याचे सांगितले. त्यानंतर डॉ. झंझाड यांनी पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यासाठी वीस हजार रुपये मागितले. शेवटी पाच हजारांवर तडजोड झाली आणि त्यांनी पोस्टमार्टम रिपोर्ट दिला.
डॉ. झंझाड यांच्या या कार्यपद्धतीला पोलिसांनी आता आक्रमकपणे उत्तर द्यायचे ठरवले आहे. झंझाड हे नेहमीच पैशांची मागणी करून अडवणूक करतात. पोस्टमॉर्टम रिपोर्ट देण्यासाठी प्रत्येकवेळेला 100 रुपये द्यावे लागतात आणि न दिल्यास काहीतरी कारण सांगून परत पाठवतात. त्यामुळे पोलीसही वैतागले आहेत. याप्रकरणी पोलीस खात्याने आता एक पत्र काढले आहे. त्याद्वारे लाचेची मागणी करणाऱ्या डॉ. झंझाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.