पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) संलग्नित अनेक महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्थांना स्वायत्त दर्जा (Autonomous Collage) मिळत आहे. येत्या काही वर्षात आणखी काही महाविद्यालयांना हा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने स्वायत्त दर्जा मिळालेल्या संलग्न महाविद्यालयांच्या समस्या आणि अडचणी लक्षात घेऊन पुणे विद्यापाठीने (Pune University) या महाविद्यालयांसाठी काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 आणि 2019 एकरूप परिनियम 3 मधल्या तरतुदी लक्षात घेऊन ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. (Savitribai Phule Pune University announced guidelines for autonomous colleges)
ही नियमावली तयार करण्यासाठी कुलगुरूंनी समिती गठीत केली होती. या समितीचा अहवाल कुलगुरूंनी स्वीकारला आहे आणि त्यातल्या शिफारसीनुसार विद्यापीठाने ही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.
यापुढे कोणत्याही स्वायत्त महाविद्यालयाला थेट पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करता येणार नाही. असा अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी संबंधित विषयातील पदवी अभ्यासक्रमाच्या किमान दोन बॅचेस उत्तीर्ण झालेल्या असणं आवश्यक असणार आहे. यासोबतच स्वायत्त दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रमांची रचना निश्चित करणे आवश्यक असणार आहे.
यूजीसीने वेळोवेळी घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे यांच्या अधीन राहून स्वायत्त दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांना आणि मान्यताप्राप्त संस्थांना विद्याविषयक आणि प्रशासकीय बाबतीत पू्र्ण स्वायत्तता असेल. अशा संस्था स्वतःचे अभ्यासक्रम तयार करू शकतात. संस्थांना प्रत्येक पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पाठ्यक्रमांचे किंवा अध्ययनक्रमाचे वास्तव मूल्य ठरवण्यासाठी एक शुल्क निश्चिती समिती असेल.
स्वायत्त संस्थांनी अभ्यासक्रमांच्या नावात बदल करू नये. नव्याने प्रस्तावित अभ्यासक्रमांचे संपूर्ण नाव आणि संक्षिप्त नाव हे यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच असावं. नवीन अभ्यासक्रमांची रचना निश्चित असावी. पुढच्या शैक्षणिक वर्षीपासून सुरू करण्यात येणाऱ्या नव्या अभ्यासक्रमाचा आराखडा आणि नवीन अभ्यासक्रमाच्या संलग्नीकरणाचा अर्ज हा 30 सप्टेंबरपूर्वी विद्यापीठाला सादर करायचा आहे.
संलग्नीकरणााठी स्वायत्त महाविद्यालये आणि संस्थांसाठी विद्यापीठकडून 10 वर्षांत फक्त एकदाच शुल्क आकारण्यात येईल. या 10 वर्षांच्या कालावधीत नवीन 3.4 अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीचे हे एकरकमी शुल्क असणार आहे. विद्यार्थी प्रवेशक्षमता, विद्यापीठाच्या प्रचलित नियमाप्रमाणे असणे बंधनकारक आहे. आवश्यक भौतिक सोयी-सुविधा, अध्यापक आणइ प्रशासकीय कर्माचाऱ्यांची उपलब्धता असल्याबाबतचा पुरावा स्वायत्तता दर्जा प्राप्त महाविद्यालयाच्या विद्यापरिषदेच्या मान्यतेने प्रस्तावासोबत सादर करणं आवश्यक आहे.
इतर बातम्या :