Pune : रस्ता अडवला म्हणून शाळेलाच सुट्टी! आरोप-प्रत्यारोपात पुण्यातल्या सिंहगड सिटी स्कूलच्या विद्यार्थ्यांचं मात्र नुकसान
महापालिकेच्या म्हणण्यानुसार, शाळेची इमारत बांधत असताना संस्थापकांनी चुकीचा रस्ता दाखवत महापालिकेचीच फसवणूक केली. त्यामुळे खासगी जागेतून रस्ता देण्याचा किंवा न देण्याचा सर्वस्वी अधिकार हा जागामालकाचा आहे.
पुणे : रस्ता बंद (Road block) केल्यामुळे चक्क शाळेला सुट्टी देण्यात आल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील सिंहगड सिटी स्कूलला (Sinhagad city school) सुट्टी देण्यात आल्याचा हा प्रकार आहे. शाळेला जाणारा खासगी रस्ता जागा मालकाने बंद केल्यामुळे शाळेला सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात महापालिका प्रशासनाला (PMC) कल्पना दिली असतानाही कुठलीही कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे. दोन्ही बाजूंनी पत्रे लावून जागामालकांनी रस्ता बंद केला आहे. या शाळेच्या जवळपास 40 ते 45 बस आहेत. त्याद्वारे विद्यार्थी शाळेत येतात. मात्र, जागामालकाने रस्ता बंद केल्याने बस शाळेच्या पार्किंगमध्येच अडकल्या. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे सांगण्यात आले आहे. शाळा बंद करावी लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे शाळा प्रशासनाने म्हटले आहे. महापालिकेकडून याबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नसल्याचेही शाळेने म्हटले आहे.
रस्ता मालकाचा आक्षेप
मंगळवारी शासकीय सुटी होती. बुधवारी शाळा ऑनलाइन भरविण्यात आली. गुरुवारी रक्षाबंधनानिमित्त सुटी होती. आता शुक्रवारी शाळा कशी भरवायची, असा प्रश्न शाळा व्यवस्थापनाला पडला. त्यामुळे सुट्टी देण्यात आली. जागा मालकाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 17 वर्षांपासून मैत्रीच्या संबंधातून आमच्या खासगी जागेतून हा रस्ता वापरावयास दिला होता. या जागेचा कोणताही मोबदला महापालिकेकडून आम्हाला मिळालेला नाही.
फलक लावून रस्ता बंद
रस्ता अडविलेल्या ठिकाणी जागा मालकाने एक फलक लावला आहे. त्यावर म्हटले आहे, की सदर रस्ता हा खासगी मालकीचा आहे. पुणे मनपाने जागा मालकाला कोणताही मोबदला न दिल्यामुळे सदरचा रस्ता बंद केला आहे. नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा. तसेच अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही शेवटी देण्यात आला आहे. जागा मालकाने सांगितल्याप्रमाणे, सिंहगड शाळेने 2007-08मध्ये महापालिकेकडून मंजूर केलेल्या नकाशात दाखविलेला रस्ता अस्तित्वात नाही. सध्याचा रस्ता हा आमच्या खासगी मालकीचा आहे. त्यामुळे शाळेशी या रस्त्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. संस्थेने विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करू नये, असे म्हटले आहे.
पाहा व्हिडिओ –
आरोप-प्रत्यारोप
महापालिकेच्या म्हणण्यानुसार, शाळेची इमारत बांधत असताना संस्थापकांनी चुकीचा रस्ता दाखवत महापालिकेचीच फसवणूक केली. त्यामुळे खासगी जागेतून रस्ता देण्याचा किंवा न देण्याचा सर्वस्वी अधिकार हा जागामालकाचा आहे. तर शाळा प्रशासनाने यावर आक्षेप घेत जर चुकीच्या पद्धतीने शाळेचे काम झाले असेल तर मागील 15 वर्षांपासून महापालिकेने शाळेला कुठल्या आधारावर सुविधा पुरविल्या, असा सवाल केला आहे. दरम्यान, या सर्व गोंधळात विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत असल्याचे दिसत आहे.