Pune Corona Update : पुण्यात 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा बंद, अजितदादांकडून निर्णय जाहीर; नियम पाळण्याचं आवाहन
पुणे शहर आणि जिल्ह्यातील 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार आहेत. या वर्गांचे ऑनलाईन क्लास सुरु राहतील. तर 9वी आणि 10वीचे वर्ग हे ऑफलाईन पद्धतीनेच सुरु राहतील असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.
पुणे : मुंबई, ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील शाळा बंद (School Closed) करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत आज कोरोनास्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी वरील निर्णय जाहीर केलाय. या निर्णयानुसार पुणे शहर आणि जिल्ह्यातील 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार आहेत. या वर्गांचे ऑनलाईन क्लास सुरु राहतील. तर 9वी आणि 10वीचे वर्ग हे ऑफलाईन पद्धतीनेच सुरु राहतील असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.
कोरोनाची स्थिती बिकट होत आहे. पुणे जिल्ह्यात 74 टक्के लोकाचं लसीकरण झालं आहे. राहिलेल्या नागरिकांनी लवकर लस घ्यावी. लोकांना विनंती आहे की कठोर निर्णय लागू करण्यास भाग पाडू नका, असं आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केलंय. तसंच पुणे शहरात पॉझिटिव्हिटी रेट 18 टक्के झाला आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. पुणे शहरात 3 हजार 950 सक्रीय रुग्ण आहेत. 15 ते 18 वयोगटातील मुलांचं 4 टक्के लसीकरण झालं आहे. पालक आणि विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.
१ ली ते ८ वीपर्यंतच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद !
आठवडाभरात वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रत्यक्ष सुरु असलेल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मा. पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत झाला आहे. सदरील वर्गांना ऑनलाईन परवानगी असेल.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 4, 2022
पुण्यात उद्यापासून ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’
तसंच वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी किंवा 2 प्लायचे सर्जिकल मास्क वापरू नका. N95 किंवा 3 प्लाय असलेल्या मास्कचाच वापर करा. पुण्यात उद्यापासून मास्क नसेल तर 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. तर मास्क नसताना थुंकल्यावर 1 हजार रुपये दंड आकारला जाईल. त्याचबरोबर उद्यापासून पुणे जिल्ह्यात सर्वत्र मॉल, खासगी तसंच सरकारी कार्यालयात कोरोना लसीचे दोन्ही डोस झाले नसतील तर प्रवेश मिळणार नाही. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस खात्याला सक्त सूचना दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
मास्क नसल्यास ५०० तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रुपये दंड !
मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड आणि मास्क नसताना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड आकारण्याचा निर्णय आज पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत घेण्यात आला असून ५ जानेवारी २०२२ पासून याची अंमलबजावणी होत आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 4, 2022
पुण्यातील आजची (4 जानेवारी) कोरोना स्थिती
दिवसभरात 1 हजार 104 नवे रुग्ण दिवसभरात 151 रुग्णांना डिस्चार्ज पुणे शहरातील एका रुग्णाचा मृत्यू सध्या 89 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू पुण्यातील एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या – 5 लाख 12 हजार 689 पुण्यातील सक्रीय रुग्णसंथ्या – 3 हजार 790 पुण्यात एकूण मृत्यू – 9 हजार 119
इतर बातम्या :