दौंड, पुणे : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमधील (MIDC) कंपन्यांमधून रसायनाच्या चोरीचे सत्र अद्यापही सुरूच आहे. एमक्युअर फार्मास्युटीकल्स लिमिटेड या कंपनीमधील पॅलेडियम ऑन कार्बन (Palladium on carbon) या सुमारे 12 लाख 54 हजार रूपये किंमतीच्या रसायानाची चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. हे अंत्यत संवेदनशील रसायन असून याबाबत कंपनीच्या व्यवस्थापकांनी दौंड पोलीस (Daund Police) स्टेशनला फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पोलीस निरीक्षक विनोद घुगे आणि त्यांच्या पथकाने कंपनीतील मौल्यवान किंमतीचे रसायन चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद केली होती. आता पुन्हा एकदा चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. चिंतेची बाब म्हणजे जे रसायन चोरीला गेले आहे, ते अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते.
कुरकुंभ एमआयडीसी परिसरात चोरीचे प्रकार वाढत आहेत. मार्च महिन्यातही याठिकाणी रसायनाची चोरी झाली होती. कोट्यवधी रुपयाचे हे रसायन होते. इटरनिस फाइन या रसायनाच्या कंपनीतून रोडियम ऑन अॅल्युमिना या नावाचे रसायन चोरीला गेले होते. चोरी झालेल्या या रसायनाची किंमत तब्बल साडेपाच कोटी रुपये इतकी असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हाही दाखल झाला होता.
दोन महिन्यापूर्वी झालेली रसायनचोरी आणि त्याचा तपास होतो न होतो, तोच पुन्हा त्याच परिसरातून मोठ्या प्रमाणात रसायन चोरीला गेले आहे. त्यामुळे पोलिसांना यातील आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान आहे. रसायन संवेदनशील आहे. त्यामुळे आरोपींना लवकर ताब्यात घेणे गरजेचे आहे. कुरकुंभ परिसरात मोठ्या प्रमाणात रसायन कंपन्या आहेत. तिथे विविध प्रकारची रसायने मिळतात. ती महागडीही असतात. आता यावर चोरट्यांची नजर पडली असून अशा घटना वारंवार घडत आहेत.