रवी लव्हेकर, सोलापूर : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याला अनेक आमदारांचा विरोध होता. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असल्याने अनेक जण तयार झाले. परंतु महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांत शिवसेनेच्या आमदारांना डावलले जाऊ लागले. त्यांना निधी दिला जात नव्हता. यामुळे राज्यातील सत्ता परिवर्तन हे आमदारांनीच केले. त्यामध्ये आपणही सहभागी होतो. अंधारात काही घडले नाही, असा दावा शिंदे गटातील बहुचर्चित आमदाराने केला.
आम्हाला गद्दारी केल्याचे वाटायचे
महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस समोर आल्यावर आम्हाला गद्दारी केल्यासारखे वाटायचे. त्यामुळे फडणवीस साहेबांना डोळ्यासमोर पाहिल्यावर डोळ्यातून पाणी यायचे, असे मत शिंदे गटातील आमदार शहाजी बापू यांनी व्यक्त केले. विधान भवनात विरोधी पक्ष नेते म्हणून फडणवीस यांच्यांकडे पाहिल्यावर डोळ्यातून पाणी येत होते. भाजपशी आम्ही गद्दारी केल्यासारखे वाटात होते. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आम्ही बांधिलकी ठेवून भाजप आणि सेना एकत्र आलो,असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणले
महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचे उद्योग त्यावेळी झाले. त्यांचा चेहरा उद्दीग्न होत होता. त्यांचे हासू निघून गेले होते. हा सर्व प्रकार आम्ही उद्धव साहेबांना सांगत होतो. परंतु उपयोग झाला नाही. यामुळे उद्धव साहेबांचा आदर ठेवूनच आम्ही शिवसेनेसाठी परिवर्तन केले. आम्ही त्यांच्या शिव्या खाऊ, पण आमची भूमिका उद्धव ठाकरे यांना एक दिवस पटणार, याची आम्हाला खात्री आहे, असे शहाजी बापू यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी फक्त शिंदेच दिसतात
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना फक्त झोपताना, उठताना, भाकरी खाताना शिंदे साहेब दिसतात, असा खोचक आरोप शहाजी बापू यांनी केला. ते म्हणाले की, संजय राऊत यांची मोठी अडचण झाली आहे. संजय राऊत यांच्यासमोर अडचण झाली आहे. गेले 25 वर्षे त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध लिहिले. आज राजकारणासाठी त्यांना कसरत करावी लागते.
उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी होत आहे. परंतु सभेतून ते फक्त शिव्या देत आहे. आम्हाला किती शिव्या दिल्या तरी आम्हाला वाईट वाटत नाही. आमच्याही सभा ५० हजारांच्या होतात. परंतु सभा आणि मतांचे गणित एक आहे, असे समजू नका, असे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला शरद पवार यांचा पाठिंबा?, काय आहे विषय, कोणी केला दावा..वाचा सविस्तर