Shahaji Patil : आम्हाला फक्त डाळिंबाची खोकी माहीत, खोके-ओक्केच्या टीकेवर शहाजी पाटलांची फटकेबाजी
इतिहासात क्रांती झाली, तसे झाले आम्ही केले. काहीही बोलतात, गद्दार म्हणतात, खोके काढतात. कुठल्या बापाला माहीत. आम्हाला डाळिंब भरण्याचे खोके माहिती आहेत फक्त, असे शहाजी पाटील म्हणाले.
पुणे : चंद्रकांत खैरे राहतात औरंगाबादला (Aurangabad). 10 ते 15 म्हणजे आकडाही अजून माहीत नाही आणि उगाच ढगात गोळ्या मारत आहेत, अशी टीका शिंदे गटाचे नेते शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. शिंदे गटाचे 10 ते 15 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य नुकतेच शिवसेनेचे औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केले होते. त्याचा समाचार घेताना शहाजी पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, त्यांना काहीही येत नाही. त्यांना कळून चुकले आहे. शेवटच्या गटांगळ्या माणूस मारतो, तशा यांच्या गटांगळ्या सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. दोन महिन्यात शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार चांगला आहे. सरकारला यश येईल, असे ते म्हणाले.
‘सरकारला यश येईल’
गेले दोन महिने महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले. काही राजकीय घटना घडल्या, अडीच वर्षापूर्वी हे सरकार बनायला हवे होते. मात्र आता सरकार बनले आहे. चांगले चालू आहे. सर्वजण अनुभवी आहेत. दोन महिन्यात सरकारचा कारभार चांगला आहे. सरकारला यश येईल, असे ते म्हणाले.
‘कोणीही नाराज नाही’
मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेकजण नाराज आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, की प्रत्येक आमदाराला अपेक्षा आहेत. मला पण वाटते मिळावे. सुहास कांदे नाराज नाहीत, वाटत नाही ते नाराज असतील. शिरसाठ आहेत जरा नाराज. आमदार म्हणून आपण पाठपुरावा करून कामे करून घेणे हे आपले काम आहे. त्यावर भर देत असल्याचे ते म्हणाले. आगामी विस्तारात त्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘शिंदेंची शिवसेनाच बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी’
दसरा मेळाव्याचे वातावरण दिसून आले नाही. मेळावा जवळ आल्यावर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात यावर अवलंबून आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच मेळावा व्हावा, अशी आमची इच्छा आहे. कारण शिंदेंची शिवसेनाच बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी आहे. उद्धव साहेबांनी बाळासाहेबांच्या विचारांवर शिवसेना चालवली असती, तर काँग्रेसबरोबर युती करण्याची वेळ आली असती का, असा सवाल त्यांनी केला आहे. बाळासाहेब असते तर काँग्रेसबरोबर युती झाली असती का, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
शहाजी पाटलांची फटकेबाजी
‘आम्हाला डाळिंब भरण्याचे खोके माहिती आहेत’
इतिहासात क्रांती झाली, तसे झाले आम्ही केले. काहीही बोलतात, गद्दार म्हणतात, खोके काढतात. कुठल्या बापाला माहीत. आम्हाला डाळिंब भरण्याचे खोके माहिती आहेत फक्त, असे म्हणत ज्यांची संस्कृतीच खोक्यावर अवलंबून आहे, तेच अशी टीका करतात, असे ते म्हणाले.
‘लक्ष्य जरा चांगले करा’
सांगोल्यावर शिवसेना लक्ष ठेवणार आहे. त्यावर ते म्हणाले, की लक्ष्य जरा चांगले करा, मी उद्धव साहेब आणि आदित्य ठाकरे यांना दोन बंगले भाड्याने घ्या. इथे येवून राहा. लोकांची कामे करा, असा टोला लगावत मला पडण्याची प्रॅक्टिस आहे. त्यामुळे लक्ष्य म्हणजे काय, असा सवाल त्यांनी केला.