मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानाचा शरद पवार यांच्याकडून खरपूस समाचार; म्हणाले, त्यांच्या बुद्धीला…
मोदींनी कोणतंही काम केलं तरी त्याला विरोध केला जातो. यापूर्वी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी अशी उद्घाटनं केली आहेत. अनेक राज्यात विधानसभांचं लोकार्पण झालंय, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पुणे : संसदेच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहणं ही विरोधकांची पोटदुखी आहे. जनताच त्यांची पोटदुखी दूर करेल. त्यांना जमाल गोटा देऊन जनता धडा शिकवेल, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली आहे. मुख्यमंभी एकनाथ शिंदे यांना तशा प्रकारची भाषा शोभते. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची गरज नाही, अशी जोरदार टीका शरद पवार यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
मुख्यमंत्र्यांना तशा प्रकारची भाषा शोभते. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करण्याची गरज नाही. त्यांच्या बुद्धीला जे शोभते ते बोलतात. त्यावर आपण काही भाष्य करू नये, अशी टीका शरद पवार यांनी केली. तर सामाजिक ऐक्याला धक्का बसेल असे प्रश्न कोणीही काढू नये, असं आवाहन त्यांनी लव्ह जिहादच्या प्रश्नावर बोलताना केलं. एमआयएमचे नेते ओवैसी यांनी लव्ह जिहादच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सवाल केला होता. त्यावर ते बोलत होते.
दावे सर्वच करतात
पुण्यात राष्ट्रवादीची ताकद सर्वाधिक आहे. त्यामुळे पुणे लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे. जिथे ज्यांची ताकद अधिक आहे. तिथे प्रबळ पक्षाचा उमेदवार दिला पाहिजे, असं विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं होतं. त्यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. निवडणुका होते की काय ते पाहू. होत असेल तर आम्ही तिघे बसून चर्चा करू. दावे सर्वच पक्ष करणार. सर्वच म्हणणार आम्हालाच मतदारसंघ हवा. पण शेवटी कोण प्रामाणिकपणे लढू शकतो आणि विजय संपादन करू शकतो हे पाहावं लागेल, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
दरम्यान, संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली होती. नवीन संसद अतिशय विक्रमी वेळेत पूर्ण होत आहे. 2019ला संसदेच्या बांधकामाला सुरुवात केली आणि आज पूर्ण होत आहे. ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. संसद हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. संसदेतून आपण जनतेला न्याय देत असतो. त्यामुळे संसदेच्या लोकार्पण प्रसंगी सर्वांनी यायला पाहिजे. काही लोकं विघ्नसंतोषी असतात. त्यांचा विरोध हा लोकशाहीचा अपमान आहे. त्यांचा विरोध कुणाला आहे? लोकशाही की मोदींना? असा सवाल त्यांनी केला.
राज्यपालांना न बोलावता उद्घाटनं
सावरकरांच्या जयंतीच्या दिवशी संसदेचं लोकार्पण होत आहे ही विरोधकांची पोटदुखी आहे. जनता यांच्या पोटदुखीला जमाल गोटा देईल. नावडतीचं मिठ आळणी असतं. त्यामुळे मोदींनी कोणतंही काम केलं तरी त्याला विरोध केला जातो. यापूर्वी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी अशी उद्घाटनं केली आहेत. अनेक राज्यात विधानसभांचं लोकार्पण झालं. त्यावेळी राज्यपालांनाही न बोलवता अनेक उद्घाटनं झाली आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.