Sharad Pawar : हळूहळू मित्रपक्षांना संपवायचं हीच भाजपाची रणनिती, नितीश कुमारांचा निर्णय योग्यच; शरद पवारांची प्रतिक्रिया
भाजपाला दगा दिला म्हणून शिवसेना फोडल्याचे वक्तव्य सुशील मोदी यांनी केले होते, त्यावर शरद पवारांनी भाजपाच्या राजकारणावर टीका केली.
बारामती, पुणे : निवडणुकीत एकत्र यायचे, मित्र पक्षातील लोकांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी घ्यायची घ्यायची आणि हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे, ही भाजपाची रणनिती आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. ते बारामतीत बोलत होते. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपासोबतची युती तोडून राजदसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यावर विचारले असता शरद पवार यांनी आपले मत व्यक्त केले तसेच भाजपावर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रात शिवसेनेत (Shivena) फूट कशी पडेल, अशी परिस्थिती निर्माण केली. अशीच खेळी बिहारमध्ये सुरू होण्याआधीच नितीश कुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आज भाजपाचे नेते त्यांच्यावर टीका टिप्पणी करत आहेत. परंतु नितीशकुमारांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे आहे, असेही शरद पवार म्हणाले.
‘त्यांनी सावध पवित्रा घेतला’
भाजपाच्या अध्यक्षांनी असे वक्तव्य केले, की प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही. ते शिल्लक राहणार नाहीत आणि आमचा एकच भाजपा हा पक्ष देशामध्ये शिल्लक राहील. नितीश कुमारांची तक्रार आहे, तीच तक्रार ही अकाली दलाची आणि इतर मित्र पक्षांची आहे. भाजपा त्यांच्यासोबत असलेल्या मित्र पक्षांना हळूहळू संपवते. सेना-भाजप एकत्र होते. मात्र आता काय परिस्थिती आहे, सेनेच्या या मित्र पक्षाने सेनेवर आघात केला. तिकडे नितीश कुमार हे लोकांच्यात मान्यता असलेले नेते आहेत. मात्र त्यांनी सावध पवित्रा घेत भाजपापासून अंतर ठेवत बाजूला झाले, असे शरद पवार म्हणाले. भाजपाला दगा दिला म्हणून शिवसेना फोडल्याचे वक्तव्य सुशील मोदी यांनी केले होते, त्यावर शरद पवारांनी भाजपाच्या राजकारणावर टीका केली.
‘सत्तेचे केंद्रीकरण झाले’
श्रीलंकेत एकाच कुटुंबाची सत्ता होती. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, अर्थमंत्री हे एकाच कुटुंबातील होते. श्रीलंकेत सत्तेचे केंद्रीकरण झाले. त्यामुळे असंतोष वाढायला लागला होता. त्यामुळे जनतेचा उद्रेक झाला. श्रीलंकेची जी परिस्थिती आहे ती एका दिवसातली किंवा काही महिन्यातली नाही. काही वर्षांतली आहे, असे ते म्हणाले.
‘सावध राहण्याची गरज’
बांगलादेशमध्ये जी परिस्थिती उद्धभवली आहे, ती पाकिस्तानमध्ये देखील उद्भवू शकते. आपल्या आजूबाजूला हे वातावरण आहे. याची नोंद आमच्या देशाच्या राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. विशेषत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेण्याची गरज आहे. सत्ता केंद्रीत जिथे झाली तिथे हे प्रश्न निर्माण झाले. भारतात राष्ट्रीय पातळीवर सत्ता केंद्रीत होते की काय याची शंका लोकांमध्ये निर्माण होत आहे. सध्या आपल्याकडे उद्रेक होण्याची परिस्थिती दिसत नाही, पण आपण सावध राहण्याची आवश्यकता आहे.