राष्ट्रवादीत फूट का पडली?; शरद पवार यांच्याकडून पहिल्यांदाच गौप्यस्फोट
मी औरंगाबादला जाणार आहे. तिथे सार्वजनिक कार्यक्रम नाही. महानोर यांचं निधन झालं. त्यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहे. प्रा. बोराडे यांच शैक्षणिक क्षेत्रात त्याचं मोठं काम होतं. त्यांचं निधन झालं. त्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेणार आहे. त्यानंतर दुपारी बीडला सभा घेणार आहे.
पुणे | 14 ऑगस्ट 2023 : राज्याच्या विकासासाठी आम्ही भाजपसोबत हातमिळवणी केली आहे, असं अजित पवार गटाकडून वारंवार सांगितलं जात आहे. तर, शरद पवार गटाकडून पक्षातील फुटीच्या कारणावर मौन पाळण्यात आलं आहे. शरद पवार यांनीही पक्षात फूट का पडली याचं कारण स्पष्ट केलेलं नाहीये. मात्र, ईडीच्या कारवायांच्या धाकानेच अजित पवार गट भाजपसोबत गेल्याचं बोललं जात आहे. त्यावर आज शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. ईडीच्या कारवायांमुळे आमचे लोक भाजपसोबत गेल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. तसेच जयंत पाटील यांच्याबाबतही तोच प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
जयंत पाटील यांच्या भावाला नोटीस आल्याचं कानावर आलं आहे. सत्तेचा गैरवापर करून पावलं टाकली जात आहे. आमच्या काही सहकाऱ्यांना नोटीसा आल्या म्हणून ते भाजपमध्ये गेले. तोच प्रयत्न जयंत पाटील यांच्याबाबत घडत आहे. पण जयंत पाटील आपल्या विचारांवर ठाम राहतील असं सांगतानाच कालच्या बैठकीत ईडीच्या कारवायांवर चर्चा झाली नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेसकडून यादी नाही
इंडिया आघाडीची 31 ऑगस्ट रोजी बैठक होत आहे. हयात हॉटेलमध्ये ही बैठक पार पडेल. त्यानंतर 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून बैठक सुरू होईल. दुपारपर्यंत ही बैठक चालणार आहे. ही बैठक आयोजित करण्याची जबाबदारी मी स्वत:, उद्धव ठकारे आणि नाना पटोले यांनी घेतली. आम्ही उत्तमरित्या बैठक पार पाडू. काँग्रेसने त्यांच्याकडून बैठकीला कोण उपस्थित राहणार याची यादी दिलेली नाही. त्यामुळे सोनिया गांधी येणार की नाही हे माहीत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मोदींच्या भाषणात अभाव
यावेळी त्यांनी मणिपूरच्या हिंसेवरून केंद्र सरकारवर टीका केली. मणिपूर हा विषय मणिपूरपर्यंत मर्यादित नाही. पूर्व पश्चिमेच्या राज्यांना लागून इतर देशांच्या सीमा आहेत. मणिपूरकडे सरकार लक्ष देत नसेल तर चिंतेची गोष्ट आहे. आम्ही संसदेत हा विषय मांडला. पण यावर चर्चा होऊ दिली नाही. आम्ही एका कलमाखाली चर्चेची मागणी केली. ती पूर्ण केली नाही. पंतप्रधान संसदेत मणिपूरवर बोलले. पण ते मणिपूरवर अत्यंत कमी वेळात बोलले. मणिपूरच्या लोकांना दिलासा देण्यासाठी जी सक्तीने भूमिका घेण्याची गरज होती. ते काहीच दिसलं नाही. त्यांच्या भाषणात त्याचा अभाव होता. त्यातून काही पदरात पडलं नाही, असं ते म्हणाले.
तुम्ही काय दिवे लावले?
तुमच्या हातात नऊ वर्ष राज्य आहे. नऊ वर्षात तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही 30 वर्षापूर्वी काय झालं सांगता. 30 वर्षापूर्वीचं वर्कींग असतं. ते संपलं. आज त्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे. मणिपूरला भाजपचं राज्य आहे. काँग्रेसने चांगलं काम केलं नाही म्हणून भाजपला संधी दिली. पण तुम्हाला 9 वर्ष संधी देऊन तुम्ही काय दिवे लावले? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
वंचितसोबत चर्चा नाही
यावेळी त्यांनी वंचित सोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष् केलं. आमची काही वंचितशी चर्चा झाली नाही. ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्रित चर्चा झाली आहे. त्याबाहेर आम्ही गेलो नाही, असंही ते म्हणाले.