यंदा बारामतीत पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडवा साजरे झाले. शरद पवारांना भेटण्यासाठी गोविंदबागेत कार्यकर्ते आले होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील काटेवाडीमध्ये पाडवा साजरा केला. याआधी संपूर्ण पवार कुटुंब गोविंदबागमध्ये दिवाळी पाडवा साजरा करायचं पण पहिल्यांदाच दोन ठिकाणी पाडवा झाला. यामुळे आपण अस्वस्थ असल्याचं शरद पवारांनी म्हटलं. अजित पवार यांना वेळ मिळाला नसल्याने ते भेटायला आले नसतील, असंही शरद पवार यावेळी म्हणाले. याचबरोबर कथित सिंचन घोटाळ्यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दोन पाडवा व्हायला नको अशी लोकांची भावना आहे. चांगली गोष्ट आहे. मला आनंद आहे. कार्यकर्त्यांची भावना आहे. अनेक वर्षाची परंपरा आहे. पाडवा या ठिकाणी साजरा केला जातो. या प्रांगणात आम्ही सर्वजण जमतो. ही जुनी पद्धत आहे. ही कायम राहिली असती तर मला आनंद झाला असता. ठिक आहे. लोकांना डबल ठिकाणी जावं लागलं. त्यांना त्रास झाला. त्यामुळे मी अस्वस्थ आहे, असं शरद पवार म्हणालेत.
आमच्या कुटुंबातील सर्व लोक पाडव्याच्या आदल्या दिवशी येतात. काल सर्व होते. अजित पवार काही कामामुळे आले नसतील. त्यांना वेळ मिळाला नसेल. पण सर्व होते. त्यांच्या दोन बहिणी इथेच होत्या. बाकी सगळे जण होते. काही काही वेळा कामामुळे माझ्याकडूनही उशीर व्हायचा. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक आले. नागपूर, बुलढाणा, गडचिरोली, कोकणातील मुंबई, मराठवाड्यातील अनेक लोक भेटले. अनेक तालुका आणि जिल्ह्यातील लोक आले. यावेळी नेहमी पेक्षा अधिक लोक आले, असं शरद पवारांनी म्हटलं.
आम्ही सिंचन घोटाळ्याचा उल्लेख आम्ही केला नाही. हा प्रश्न कुणी काढला हे सांगायची गरज नाही. राज्याच्या राजकारणातील स्वच्छ व्यक्ती म्हणून लौकीक होता, उत्तम प्रशासक म्हणून लौकीक होता अशा नेत्याबाबत उलटीसुलटी चर्चा होणं हे अशोभनीय आहे. हे घडलं नसतं तर आनंद झाला आहे. जी व्यक्ती जाऊन ९ वर्ष झाली,. त्यांची प्रतिमा चांगली होती. त्यांच्यावर काही बोललं जातं. ठिक आहे. सत्ता हातात आल्यावर आपण काहीही बोलण्यास मुक्त आहोत असं काही लोकांना वाटतं त्यातली हा भाग असेल, असंही शरद पवार म्हणालेत.