पुणे : अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधीविषयी पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. रिपब्लिकन भारत या वृत्तवाहिनीला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्या आशीर्वादानेच पहाटेचा शपथविधी झाला होता, असा दावा फडणवीस यांनी केला. तसेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार यावे म्हणून शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांच्या या मुलाखतीनंतर शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. राज्यातील कायदा अन् सुव्यवस्थेची परिस्थिती कशी आहे? किती मुली बेपत्ता झाल्या आहेत? याची आकडेवारी शरद पवार यांनी सादर करत देवेंद्र फडणवीस यांच्यांवर निशाणा साधला.
राज्यात शिवसेना-भाजपचे नवीन सरकारला येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात राज्यात कायदा अन् सुव्यवस्थाची परिस्थिती गंभीर झाली आहे. जानेवारी २०२३ ते २३ मे २०२३ पर्यंत पुणे शहरातून ९३७ मुली बेपत्ता झाल्या आहेत. ठाण्यातून ७२१, मुंबईतून ७३८ मुली बेपत्ता आहेत. तसेच सोलापूरातून ६२ मुली बेपत्ता आहेत. सर्व मिळून २ हजार ६५८ मुली बेपत्ता आहेत. राज्यातील १४ जिल्ह्यातील हा आकडा ४ हजारांपेक्षा जास्त आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. राज्यात दीडवर्षात ६ हजार ८८९ मुली बेपत्ता झाल्या आहेत. राज्यातील गृहमंत्र्यांनी बाकीचे वक्तव्य करण्याऐवजी या महिलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबियांची हवाली करायला हवे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
समान नागरी कायद्यासंदर्भात विधी अयोगाकडून प्रस्ताव मागवण्यात आला आहे, त्याची माहिती मला नाही. मोदी यांच्याकडे नेमके काय प्रस्ताव आले आहेत, नेमक्या काय सूचना केल्या आहेत, ही माहिती समोर आली पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशात समान नागरी कायद्यासंदर्भात मत व्यक्त केले होते. त्यावर ते बोलत होते. या कायद्यासंदर्भात शीख, ख्रिश्चन समाजातील लोकांचे काय मत आहेस हे जाणून घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
शिखर बँकेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, शिखर बँक घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही लोकांची नाव आली होती, त्यावेळी मुख्यमंत्री भाजपचे होते , आमचा त्याच्याशी काही संबंध नाहीय, असे शरद पवार यांनी सांगत यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.