…तर मार्ग निघाला असता, नाशिकच्या जागेबाबत शरद पवार यांचं मोठं वक्तव्य
कोथरूडमध्ये पाटलांचं काय योगदान होतं. जो माणूस आपल्या जिल्ह्यात निवडून आला नाही, त्याला काय बोलायचं. चंद्रकांत पाटील शक्तिमान माणूस असल्याचा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
पुणे : नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. सुधीर तांबे यांना काँग्रेसनं एबी फार्म देऊनही त्यांनी अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळं काँग्रेसचा अधिकृत उमेदवार तिथं उभा राहू शकला नाही. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, बसून चर्चा केली असती, तर मार्ग निघाला असता. तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीचं देवेंद्र फडणवीस हे श्रेय घेत असतील, तर घेऊ द्या, असं शरद पवार यांनी म्हंटलंय. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना हा टोला लगावला. नाशिक मतदार संघाबाबत शरद पवार म्हणाले, माझी कुणाशी चर्चा झाली नाही. हे चित्र जे दिसतं आहे, काळजी करण्यासारखे आहे. मला जागेबाबत माझ्या पक्षाने कळवले होते. आम्ही एकमेकाला सहकार्य करण्याचं ठरवलं होतं. नागपूरमध्ये आम्ही सेनेला पाठिंबा देऊ. नाशिकबाबतीत मला अधिक माहिती नाही, असंही त्यांनी सांगितलं.
सगळ्यांनी समजूत दाखवायला पाहिजे होती
काँगेसने ज्याला तिकीट दिलं होते त्यानी कामदेखील केलं आहे. त्या ठिकाणी तरुण कार्यकर्त्याला संधी दिली. तांबे हे काही पक्षाच्या बाहेरचे नाहीत. बसून वाद मिटवता आला असता. अजूनदेखील वाद मिटवता येऊ शकतो. जे घडलं ते नाकारता येणार नाही. थोरात पक्षाचे मोठे नेते आहेत. सगळ्यांनी समजूत दाखवायला पाहिजे होती, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
चंद्रकांत पाटील शक्तिमान माणूस
कोथरूडमध्ये पाटलांचं काय योगदान होतं. जो माणूस आपल्या जिल्ह्यात निवडून आला नाही, त्याला काय बोलायचं. चंद्रकांत पाटील शक्तिमान माणूस असल्याचा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
त्याच्या घरात कुस्तीचं वेड
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचे मनापासून अभिनंदन. त्याने नांदेडचं जरी नेत्रुत्व केलं असेल तरी त्याचं बालपण पुणे जिल्ह्यात गेलं. त्याच्या घरात कुस्तीच वेड होतं. त्याला आधीच ही संधी मिळाली असती. पण त्याला शारीरिक इजा झाली. १ वर्ष त्याच्यावर उपचार करावे लागले. ती खूप खर्चिक होती. मी जगाचं आणि देशाच्या क्रिकेटचं नेत्रुत्व केलं.
मी अनेक खेळाच्या संघटनेचा अध्यक्ष होतो. मी महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेची जबाबदारीही स्वीकारली होती. हे लोकं काही धनाढ्य कुटुंबातले नाहीत. तालीम खूप खर्चिक आहे. म्हणून त्यांच्या पाठीशी कुणीतरी उभं राहिले पाहिजे, असं मतही पवार यांनी व्यक्त केलं.
हे मी जाहीरपणे सांगितलं नाही
काका पवार यांच्यासारखे अनेक माणसे पुढं आली. ती मालिकाच सुरू झाली. किरण भगत, अभिजित कटके, राहुल अव्हारे आणि शिवराज या सगळ्या मुलांना आम्ही मदत केली. हे मी आधी कधी जाहीरपणे सांगितलं नाही. पण आज सांगत आहे. मी आणि माझी भावकी (काका पवार) यांना मदत करत राहू, असं आश्वासनही शरद पवार यांनी दिलं.
शिवराज राक्षेने कर्तृत्व दाखवलं. त्यांच्या मेहनीतीने यश मिळवले. शिवराज हा फक्त पहिला टप्पा आहे. हा दिवसही महत्वाचा आहे. पण तुला अजून पुढं जायचं आहे. खशाबा जाधव यांच्यासाठी काही करु शकलो नाही, याची आम्हाला खंत आहे. आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहू, असं आश्वासन शरद पवार यांनी दिलं.