सातारा : सातारा-जावळीचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मी कुठलंही आमंत्रण दिलेलं नाही. पक्षाच्या निष्ठेबद्दल कुणीही मला काहीही सांगायची गरज नाही. पक्षाबद्दल काय करायचे याची मला पूर्ण जाण आहे, अशी प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. राष्ट्रवादीचे नेते दिपक पवार यांच्या सल्ल्यावर शशिकांत शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. (Shashikant Shinde Comment on Shivendra Raje Bhosale)
“दिपक पवार यांचा गैरसमज झालेला आहे. मला पत्रकारांनी शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत आले तर नगरपालिकेच्या निवडणुकीला काय कराल? असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना पक्षाने जर त्यांना स्विकारले, तर पालिकेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली घेतली जाईल. या व्यतिरिक्त कोणतेही उद्गार काढले नाही, असे स्पष्टीकरण शशिकांत शिंदे यांनी दिले.
“शिवेंद्रराजेंना मी कोणतंही निमंत्रण दिलेले नाही”
राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने नगरपालिका लढवणार आहे. शिवेंद्रराजेंना मी कोणतंही निमंत्रण दिलेले नाही. पक्षाच्या निष्ठेबद्दल कुणीही मला सांगायची गरज नाही. पक्षाबद्दल काय करायचे याची मला पूर्ण जाण आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आहे. तो पूर्णपणे पार पाडणार असल्याची प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली.
जिल्हा बँकेची निवडणूक जवळ आल्यामुळे येथील राजकारण चांगलंच तापलं आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीकडून शक्य ते प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘शिंदे साहेब तुम्ही आणि मी एकच आहोत’ आहोत, असे वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केले होते. या वक्तव्यामुळे शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजे यांना राष्ट्रवादीत येण्याची थेट ऑफर दिली असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
दीपक पवार काय म्हणाले होते?
“जिल्हा बँकेची निवडणूक आली आहे. काहींना वाटतंय की शिवेंद्रराजेंना पॅनेलमध्ये घ्यायला हवं. याबाबत माझं वैयक्तिक मत आहे की ज्या माणसाने स्वत:हाच्या दोन बँका विकल्या, पाच संस्था विकल्या अशा व्यक्तीची कोणतीही मदत बँकेच्या निवडणुकीत होणार नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादीची पूर्ण ताकद आहे. राष्ट्रवादीने पूर्ण ताकदीने बँकेची निवडणूक लढवावी. शशिकांत शिंदे यांनी फिरताना कोणतही वक्तव्य करताना थोडं भान ठेवायला हवं,” असे दीपक पवार म्हणाले.
काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजे यांना राष्ट्रवादीत येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यावेळी बोलताना, शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत आले, तर ते नगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व करतील. आम्ही त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढू, असे वक्तव्य केले होते. मात्र, त्यांच्या या भूमिकेला राष्ट्रवादीतूनच विरोध होतोय. दीपक पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. “शशिकांत शिंदे शिवेंद्रराजेंना पक्षात येण्याचं निमंत्रण देतायत. नगरपालिकेत नेतृत्व करा असे सांगतायत. कृपया असली वक्तव्यं थांबवावीत. तुमच्या या विधानामुळे जावळी मतदारसंघातील तुम्हाला मत दिलेल्या 76 हजार मतदारांमध्ये संभ्रम वाढतॊय. तुम्ही माझे सहकारी आहात. कोणत्याही वल्गना करुन राजकारणाचे अवलोकन करु नका. आपल्या पक्षाचे काम बघा, असा सल्ला पवार यांनी शशिकांत शिंदे यांना दिला. (Shashikant Shinde Comment on Shivendra Raje Bhosale)
संबंधित बातम्या :
शशिकांत शिंदेंसोबत दिलजमाईचे संकेत, शिवेंद्रराजेंचे ‘राष्ट्रवादी पुन्हा’?