Lok Sabha Election 2024 : तुझ्यासारखा खासदार आम्हाला चाटायचा आहे का? या नेत्यावर टीका करताना प्रवीण दरेकरांची जीभ घसरली
Praveen Darekar On Amol Kolhe : तळपत्या उन्हात राजकीय वातावरण तापलं आहे. एकमेकांवर बेछूटच काय तर खालच्या पातळीपर्यंत आरोपांची राळ उठली आहे. बारामतीनंतर शिरुर मतदारसंघ चुरशीची लढत रंगली आहे. हा मतदारसंघ खेचून आणण्यासाठी तर दुसरीकडे अस्तित्वासाठी रणधुमाळी माजली आहे.
लोकसभा निवडणूक 2024 मधील राजकीय आखाड्यात अनेकांनी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकले आहे. अनेक नेते एकमेकांवर बेछूट आरोप करत आहेत. आरोप करताना कधी कधी मर्यादा पण गळून पडतात. बारामतीनंतर आता शिरुरकडे सर्वांनी मोर्चा वळवला आहे. हा मतदार संघ खेचून आणण्यासाठी चुरशीची लढत सुरु आहे. त्यातच भाजप नेते प्रवीण दरेकरांच्या एका विधानाने सर्वांचे लक्ष वेधेल आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना त्यांचा तोल गेला.
त्यांना खासदार करुन काय फायदा
निधी चाटायचं आहे का? असं हा खासदार म्हणतोय. अरे मग तुझ्या सारखा खासदार आम्हाला चाटायचा आहे का? हे तुम्ही दाखवून द्या.केंद्रात सरकार आपलं, राज्यात सरकार आपलं. मग या दिवट्याला (अमोल कोल्हे) खासदार करून काय फायदा. तुमचा विकास कसा होणार? अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. अजित दादांचा चेहरा प्रफुल्लित असताना जरा रोहित पवारांचा चेहरा बघा. सुप्रिया सुळेंचा पराभव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
जुन्नरमध्ये भक्कम एकी
जुन्नरकरांनी आढळरावांचा विजयाचा निर्धार पक्का केला आहे. जुन्नरमध्ये महायुतीची भक्कम एकी झाली आहे. सर्व एकत्रित येण्याचे किमयागार नरेंद्र मोदी आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्रात शिवसेना, भाजप , राष्ट्रवादी ची वज्रमूठ तयार झाली. कोण खासदार होतोय, कोण आमदार होतोय त्यापेक्षा माझ्या भागाच्या हिताचे काम कोण करतय हे महत्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अभिनेता आणि नेता यातील ही निवडणूक
अमोल कोल्हे यांच्यावर त्यांनी जहरी टीका केली. हा देश कोण चालवणार, पंतप्रधान कोण होणार ही ठरवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक महायुतीत विश्वास निर्माण करणारी आहे. महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले तर महायुतीचा नाद कोणी करणार नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलोय. ही निवडणूक देशासाठी महत्वाची आहे. अभिनेता व नेता यातील ही निवडणूक आहे. अभिनेता चांगला अभिनय करू शकतो पण चांगले काम करू शकत नाही. तुमच्या सुख दुःखात येऊ शकत नाही, असा टोला त्यांनी कोल्हे यांना लगावला.