प्रदीप कापसे, पुणे : शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) या दोन पक्षांच्या युतीची घोषणा मागील वर्षी झाली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली होती. राज्यातील प्रादेशिक पक्ष संपवून टाकण्याचं कट कारस्थान सुरु असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले होते. या दोन्ही संघटनांची बैठक शुक्रवारी झाली.
मातोश्रीवर झालेल्या या बैठकीत संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांनी अनेक निर्णय घेतले.
काय घेतले निर्णय
शिवसेना उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडमध्ये एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच राज्यात आता शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचे संयुक्त मेळावे होणार आहे. राज्यात होणाऱ्या दंगली थोपवण्यासंदर्भात आता संभाजी ब्रिगेड महत्वाची भूमिका घेणार आहे. दोन्ही संघटनांची एकत्रित भूमिका घेऊन लोकांपर्यंत जा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी यावेळी केल्या. बैठकीवेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे उपस्थित होते. या बैठकीत निवडणुकीवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
निवडणूका एकत्र लढणार
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी युती करताना दोन्ही संघटना एकत्रित निवडणुका लढवणार असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले, ही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. भविष्यात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एक युती म्हणून काम करेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकीत आम्ही एकत्रपणे लढवणार आहे.
संभाजी ब्रिगेडची मागणी
मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांच नावं द्या, अशी मागणी नुकतीच संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारकडे केली आहे. या निर्णयामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान होईल. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा महापुरुषांच्या यादीत समावेश करा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांकडे संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केली.