Shivsena protest : यांना जोडेच नाही, सापडल्यावर मारणारही; एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आक्रमक शिवसैनिकांचा इशारा, पुण्यात जोडे मारो आंदोलन
राजगुरूनगर येथील पुणे नाशिक महामार्गांवर तसेच येरवडा याठिकाणच्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आंदोलन केले. यापुढेही तीव्र स्वरुपाची आंदोलन सुरूच राहणार आहेत, असे शिवसैनिक म्हणाले.
पुणे : यांना जोडेच नाही, तर सापडल्यावर मारणारदेखील आहोत, असा संताप आक्रमक शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. पुण्यात शिवसेनेने जोडे मारो आंदोलन केले, त्यावेळी शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांवर (Shiv Sena’s rebel MLA) आपला संताप व्यक्त केला. शिवसैनिक कडवा है, एकनाथ शिंदे भ** है, आवाज कुणाचा-शिवसेनेचा, या गद्दारांचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशी घोषणाबाजी करत शिवसेनेने आंदोलन (Shivsena protest) केले. कोथरूडमध्ये शिवसेनेचे हे जोडे मारो आंदोलन झाले. कोथरूडमधली कर्वे पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. गद्दार आमदारांच्या फोटोंना यावेळी जोडे मारण्यात आले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या राज्यातील कट्टर शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे, असे शिवसैनिक म्हणाले.
शहरात विविध ठिकाणी आंदोलने
शिवसेनेशी गद्दारी, बंडखोरी करून गेलेल्यांना रस्त्यावर उतरून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. राज्य सरकार पूर्णपणे टिकणार. अनेक आमदारांना कशासाठी नेले होते, याची माहितीदेखील त्यांना नव्हती. अनेक आमदारांना फसवून नेले आहे. आम्हाला विश्वास आहे, हे आमदार मुंबईत आल्यानंतर ठामपणे शिवसेनेच्या पाठीशीच उभे राहतील, असे शिवसैनिक म्हणाले. पुणे शहरात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली आहेत. राजगुरूनगर येथील पुणे नाशिक महामार्गांवर तसेच येरवडा याठिकाणच्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आंदोलन केले. यापुढेही तीव्र स्वरुपाची आंदोलन सुरूच राहणार आहेत. जोडे मारण्यावरच थांबणार नाही, तर समोर आल्यावर हे आमदार मारदेखील खातील, असा इशारादेखील शिवसैनिकांनी दिला.
शिवसेना स्टाइलने सत्कार
पुणे शहरात एकनाथ शिंदे यांचा एकही समर्थक नाही. पुण्यात वैद्यकीय सेनेचा कुणाल कांदे याने राजीनामा दिला आहे. त्यांनी एक समकक्ष यंत्रणा तयार केली होती, त्यातील अनेकांनी आज राजीनामे दिलेले आहेत. झाशीची राणी चौकात, तसेच शिवसेनेच्या मेळाव्यानंतर आंदोलन करणार असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. ज्या ठिकाणी शिवसेनेच्या गद्दारांची कार्यालये असतील तिथे शिवसेना स्टाइलने सत्कार करणार. काही लोकांचे सत्कार केलेले आहेत, असा टोला लगावण्यात आला. आदरणीय पक्षप्रमुखांना ज्यांनी त्रास दिला, त्यांना त्यांची जागा दाखवणार, असा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला.