पुणे : आ. रवी राणा आणि खा. नवनीत राणा हे भाडोत्री टॅक्सी आहेत. हनुमान चालिसा (Hanuman chalisa) हे श्रद्धापूर्वक करण्याची बाब आहे. परंतू त्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर होत आहे. यास आमचा नेहमीच विरोध असणार आहे. भाजपाचे (BJP) हे भाडोत्री शेंदाडशिपाई असल्याची घणाघाती टीका शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. मागील दोन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर राणा दाम्पत्याचे आंदोलन सुरू आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मातोश्रीबाहेर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यावर टीका करत भाजपावरही निशाणा साधला. यात राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिका राजकारणावरून वातावरण तापले असताना कालपासूनच शिवसैनिकही मातोश्रीवर ठाण मांडून आहेत. काल काही शिवसैनिकांनी रात्री नवनीत राणा यांच्या घराबाहेर जाऊन निदर्शने केली. रात्रभर शिवसैनिक राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर ठाण मांडून होते. तर काही शिवसैनिक मातोश्रीबाहेर जोरदार घोषणाबाजी करत राणा दाम्पत्यांचा निषेध नोंदवत होते.
राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना दिलेत. आम्हाला धमकावण्याचा आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय. भगवंताला प्रार्थना करतो. या सगळ्यांना बुद्धी येवो. बाळासाहेबांच्या विचारांवर या सगळ्यांनी चालावे, असे आम्ही आवाहन करतो. यांचे डोके ठिकाणावर आले पाहिजे. त्यासाठी आम्ही मातोश्रीवर जाणार. पठण करणार. पण पोलीस आम्हाला थांबवत आहेत, असा आरोप राणा दाम्पत्याने लावला आहे.