पुणे : सहा वर्षाच्या सानवी चौंडे या मुलीला एका असाध्य रोगाने ग्रासले आहे. तिच्यावर काही सर्जरी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सुमारे 40 लाखांचा खर्च आहे. मात्र, हा खर्च पेलवणे तिच्या वडिलांना शक्य नाही. कारण तिचे वडील मोलमजुरी करतात. त्यामुळे ठाकरे गटाकडून तिच्यासाठी मदत काढली. पण ती मदतही तुटपुंजी ठरली. अवघे साडे सहा लाख रुपये जमले. त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सानवीसाठी धावून आल्या आणि सानवीच्या ऑपरेशनचा प्रश्न चुटकीसरशी सुटला. सुषमा अंधारे यांनीच ही माहिती त्यांच्या फेसबुक पेजवरून दिली आहे.
काल शिवगर्जना आणि परळी येथील शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने जाणे झाले. कुठल्याही महापुरुषाची जयंती म्हटलं की मोठे बॅनर, डीजे हार, फटाक्यांची आतिषबाजी आणि तामझाम या सगळ्या गोष्टी ओघाने आल्याच. मात्र परळीतील अत्यंत संवेदनशील शिवसैनिकांनी युवासेना तालुकाप्रमुख अतुल डुबे उपजिल्हाप्रमुख पप्पू ठक्कर या सगळ्या मंडळींनी सामाजिक बांधिलकी जपत शिवजयंतीचा निधी हा सत्कारणी लावला.
…झाले असे की सानवी चौंडे ही सहा वर्षाची बालिका आहे. ती खाली सिमिया या असाध्य रोगाने ग्रस्त आहे. वयाच्या सातव्या महिन्यातच तिचा हा आजार उघडकीस आला. या आजारामध्ये दर पंधरा दिवसाला शरीरात नव्याने रक्त भरावे लागते. सानवीसाठी ज्या शस्त्रक्रिया कराव्या लागतील त्याचा खर्च तब्बल 35 ते 40 लाख रुपये सांगितला. मात्र सानवीचे वडील हे एका साध्या प्रिंटिंग प्रेसमधील मजूर आहेत. त्यांना हा खर्च झेपणारा नव्हता.
परळीतील अनेक सुजाण लोक यासाठी पुढे आले. शिवसैनिकांनी मदत फेरी काढली आणि संपूर्ण व्यापारी तसेच शाळा महाविद्यालयातून लहान मुलांनी खाऊचे जमवलेले पैसे यातून तब्बल सहा लाख 46 हजार रुपये इतकी रक्कम जमा झाली. परंतु ही रक्कम सुद्धा तुटपुंजी होती. काल ही माहिती मला मिळताच मी तात्काळ शिवसेनेचे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्याशी सदरील आजाराच्या संबंधाने विस्तृत माहिती घेत चर्चा केली. आपण याला कशी मदत करू शकतो हेही विचारले.
यावर तात्काळ डॉक्टर हर्षल माने यांनी होकार दिला. सानवीच्या वडिलांना एकही रुपया खर्च न करू देता संपूर्ण ऑपरेशनची जबाबदारी आपण घेऊ असं सांगितलं. तब्बल 40 लाख रुपये खर्च असणाऱ्या शस्त्रक्रियेची जबाबदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जळगाव जिल्हा प्रमुख डॉक्टर हर्षल माने यांनी घेतली. सानवी यावर्षी आजाराची झुंज देत आहेय परंतु या शस्त्रक्रियेनंतर पुढील शिवजयंतीला सानवी आपल्या सगळ्यांच्या सोबत शिवजयंतीचा आनंद घेण्यासाठी सज्ज असेल अशी आशा करूया…