आरोपी गोळीबार करतो, तेव्हा पोलिसांनी बंदूक शोकेसमध्ये ठेवायची ? एकनाथ शिंदे यांचा टोला
आम्ही लोकंच्या मनातील सरकार आणलं आणि सर्व स्पीड ब्रेकर तोडून टाकले. आम्ही सर्व स्थगित्या मोडीत काढल्या. आपण कामांचा धडाका लावला. एकीकडे विकास होत आहेत. दुसरीकडे उद्योग येत आहे. राज्यात परदेशी गुंतवणूकही देशाच्या गुंतवणुकीच्या 52 टक्के झाली आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
बदलापूर एन्काऊंटरवरुन राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. या वादाचे पडसाद पुण्यातील मेट्रोच्या कार्यक्रमात देखील उमटले. पुणे मेट्रोच्या मार्गिकेसह एकूण 22,000 हजार कोटीच्या विकास कामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर एन्काऊंटरचा विषय काढला. विरोधकांनी दोन्ही बाजूंनी बोलायची सवयच आहे. बदलापूर प्रकरणात आधी म्हणत होते. आरोपीला भरचौकात फाशी द्या. आता आरोपीने पोलिसांवरच गोळीबार केला तर पोलिसांनी बंदूकी शोकेस मध्ये ठेवल्यात का ? असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की पुणे मेट्रोचा कार्यक्रम खरेतर गुरुवारी होणार होता. परंतू पावसामुळे उद्घाटन होऊ शकले नाही. सर्वकाही तयारी होती. परंतू लोकांना त्रास होईल म्हणून पंतप्रधानांनी स्वत: हा कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती केली. इतके संवेदनशील आपले पंतप्रधान आहेत. परंतू विरोधक दोन्ही बाजूंनी बोलतात. आम्ही करतो उद्घाटन असे विरोधक बोलू लागले. दोन्ही बाजूंनी बोलतो चालतो त्याला काय म्हणतात ? माहीती आहे का ? असा सवाल मुख्यमंत्र्यांंनी यावेळी केला. तेव्हा उपस्थितांतून मांडुळ असा उल्लेख झाला.
लाडकी बहीण योजना सुरुच राहणार
लाडकी बहीण योजना मतांसाठी सुरु केलेली नाही ती महिलांच्या संसारला आधार देण्यासाठी सुरु केलेली आहे. एक कोटी 90 लाख लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे गेलेले आहे. आता सप्टेंबर, ऑक्टोबरचे पैसे येतील. वर्षभराची तरतूद केलेली आहे. किती कुणी काही म्हटले तरी कितीही खोडा घातला. कोर्टात गेले तरी ही योजना सुरु राहणार आहे ही योजना बंद केली जाणार नाही. आपले सरकार येणार असल्याने ही योजना सुरुच राहणार काही काळजी करु नका असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. लाडके भाऊ योजना देखील आहे. स्टायपेंड देणारे हे पहिले राज्य आहे. देशातील तरुणाला प्रशिक्षण काळात विद्यावेतन मिळणार आहे.सहा हजार, आठ हजार आणि दहा हजार मिळणारच आहेत. लाडकी बहीण योजना हिट ठरली आहे.तसेच लाडका भाऊ योजना हीट ठरणार आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पुणे मेट्रोमुळे कोंडी फुटणार
मोदी बाहेरच्या देशात जाऊन देशाची शान वाढवत आहेत, मात्र दुसरीकडे ज्यांना देशात बोलण्याची हिंमत होत नाही ते बाहेर जाऊन बोलत असतात असा उल्लेख करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांचे नावं न घेता त्यांना टोला हाणला. पुण्याच्या या नवीन मेट्रो मार्गांमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.