Pune rain : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे ‘रेड अलर्ट’वर तर मुंबईला ऑरेंज अलर्ट, 3 दिवस मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा
राज्यात विविध जिल्ह्यांत विशेषत: विदर्भातील जिल्ह्यांत या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे संपर्काचे माध्यमदेखील नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पुणे : पुणे आणि परिसराला पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा (Heavy rain) इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्याना रेड अलर्ट (Red alert) जारी करण्यात आला आहे. तर मुंबईला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मध्यंतरी पाऊस कमी झाला होता. मात्र मागील तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस राज्यात अनेक जिल्ह्यांत बरसत आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थितीही निर्माण झाली आहे. यातच आता अजून तीन दिवस पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या मुसळधार पावसामुळे शेतजमिनींचे मोठे नुकसान (Crop damaged) झाले आहे. दोन ते तीन दिवसांपासून पिके पाण्यात असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
लोणावळ्यातही जोरदार पर्जन्यवृष्टी
आठ दिवसांपासून पाठ फिरवलेल्या पावसाने पिंपरी-चिंचवड शहरात दमदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. गेले काही दिवस वातावरणात उकाडा जाणवत होता. परंतु पावसाच्या हजेरीने कष्टकऱ्यांच्या नगरीत गारवा निर्माण झाला आहे.
आत्तापर्यंत लोणावळा परिसरात 3408 मिमी पाऊस
पर्यटन नगरी लोणावळ्यात पुन्हा एकदा वरूनराजाने जोरदार हजेरी लावली आहे. नदी, नाले, धबधबे वाहू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. आता जोरदार पाऊस सुरू आहे. लोणावळ्यात गेल्या 24 तासांत तब्बल 218 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर लोणावळ्यात आत्तापर्यंत 3408 मिमी कोसळला आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे.
पूरपरिस्थिती आणि नुकसान
राज्यात विविध जिल्ह्यांत विशेषत: विदर्भातील जिल्ह्यांत या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे संपर्काचे माध्यमदेखील नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. भामरागड तालुका मुख्यालयाजवळील जवळपास 40 घरे पुराच्या पाण्यात गेली आहेत. आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग मागील तीन दिवसांपासून बंद आहे. सध्या पाऊस थांबला आहे, मात्र आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रावती नदीला पूर आला आहे.