लोकसभेत बारामतीचा गड सर करण्यासाठी भाजपची रणनीती, काय आहे मिशन 2024?

| Updated on: Jun 12, 2023 | 2:59 PM

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी भारतीय जनता पक्षाने सुरु केली आहे. यासाठी प्रत्येक मतदार संघाची जबाबदारी वाटण्यात आली आहे. शरद पवार यांचे वर्चस्व असलेल्या बारामती मतदार संघाकडे विशेष लक्ष दिले आहे.

लोकसभेत बारामतीचा गड सर करण्यासाठी भाजपची रणनीती, काय आहे मिशन 2024?
Image Credit source: social media
Follow us on

योगेश बोरसे, पुणे : पुणे जिल्ह्यात भाजपने मिशन 2024 मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघाची जबाबदारी वाटण्यात आली आहे. पुण्यातील तीन लोकसभा मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पुन्हा राहुल कुल यांच्याकडे दिली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे दिली आहे.

बारामतीवर विशेष लक्ष

बारामती मतदार संघ हा शरद पवार यांचा गड आहे. या लोकसभा मतदार संघात दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ येतात. या लोकसभा मतदार संघावर १९९१ पासून पवार कुटुंबियांचे वर्चस्व आहे. या मतदार संघावर भाजपचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी राहुल कुल यांच्याकडे आली आहे. ही जबाबदारी मिळतात राहुल कुल यांनी कामाला सुरुवात केली आहे.

पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक

बारामती लोकसभेसाठी भाजपकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. भाजपचे बारामती लोकसभेचे प्रमुख आमदार राहुल कुल यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मिशन २०२४ ची रणनीती तयार केली आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, प्रत्येक बूथ सक्षम करण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन कुल यांनी केले आहे. या बैठकीला बारामती, पुरंदर, दौंड तालुक्यातील भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

शिरुर, पुणेसाठी जोरदार मोर्चेबांधणी

भाजपने पुणे लोकसभा मतदार संघ अन् शिरुर लोकसभा मतदार संघासाठी मोर्चा बांधणी सुरु केली आहे. शिरुरमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी अन् हडपसर विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदार संघात येतात. २००९ पासून या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व होते. परंतु २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेने ही जागा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे या ठिकाणी खासदार झाले. पुण्यात गिरीश बापट यांची जागा कायम राखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

पुणे लोकसभा मतदार संघात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे छावणी अन् कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ येतो. २०१४ पासून या ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. गिरीश बापट २०१९ मध्ये या ठिकाणी खासदार झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यामुळे सध्या ही जागा रिक्त आहे. आता या ठिकाणी मुरलीधर मोहोळ हे त्यांचे वारसदार ठरणार का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.