SSC exam: दहावीची परीक्षा घ्यायचा आग्रह धरु नका, अन्यथा ठार मारु; याचिकाकर्त्याला धमकी
दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करु नये, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. | SSC exam Maharashtra
पुणे: राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असतानाच आता परीक्षेसाठी आग्रही असणाऱ्या याचिकाकर्त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच दहावीची परीक्षा (SSC exam) रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पुण्यातील धनंजय कुलकर्णी यांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. (SSC exam in Maharashtra)
तेव्हापासून मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणावर सुनावणी सुरु आहे. दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करु नये, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये धनंजय कुलकर्णी यांचाही समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर धनंजय कुलकर्णी यांना सोशल मीडियावर दोन व्यक्तींनी धमकी दिली. परीक्षा घेतल्यानं विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे परीक्षा घेण्याची मागणी करू नका. अन्यथा तुम्हाला ठार मारू, अशी धमकी या दोघांनी कुलकर्णी यांना दिली. यानंतर धनंजय कुलकर्णी यांनी कोथरूड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्रथमेश पाटील आणि भगवान ढाकणे या दोघांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी या दोघांचा शोध सुरु केला आहे.
दहावीचा निकाल कसा लावणार? राज्य सरकारचे निकष काय?
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लावताना 9 वी व10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे.
1. विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील. 2. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील. 3. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. संबंधित बातम्या:
राज्य सरकारकडून दहावीच्या निकालाचे निकष जाहीर, याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांना काय वाटतं?
(SSC exam in Maharashtra)