Pune Schools : राज्यभरातल्या शाळा सुरू; कुठे चॉकलेट देऊन, कुठे पुस्तके देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत; पुण्यात विद्यार्थ्यांसह पालकही भारावले
शाळा सुरू झाल्यानंतर आज विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा आपल्याला शाळेत जायला मिळणार, म्हणून विद्यार्थीही आनंदी आहेत. शाळेचा पहिला दिवस आहे. छान वाटत आहे, अशा प्रतिक्रिया विद्यार्थी देत आहेत.
Pune, आजपासून राज्यभरातील शाळा सुरू (Schools started) झाल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून शाळा सुरू झाल्या. आज शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांचे विविध शाळांमध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. पुण्यातील भावे शाळेत विद्यार्थ्यांचे चॉकलेट (Chocolate) देऊन स्वागत करण्यात आले. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा आपल्याला शाळेत जायला मिळणार, म्हणून विद्यार्थीही आनंदी आहेत. शाळेचा पहिला दिवस आहे. छान वाटत आहे, अशा प्रतिक्रिया विद्यार्थी देत आहेत. दुसरीकडे पुण्यातील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये (E learning school) मुलांचे स्वागत जोकरने केले. शाळेत आल्यामुळे मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. कोरोनाच्या नियमांचे पालन करून पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवले. राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमधील विद्यार्थी कैवल्य पोपळे हा मुलगा नेत्यांचे-अभिनेत्यांचे आवाज काढतो. शरद पवार, नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन यांचे आवाज त्याने काढले. तर मोठा होऊन आरबीआयचा गव्हर्नर बनायचे आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
वाल्हेतील रयत शिक्षण संस्थेत बैलगाडीतून नवागतांचे स्वागत
वाल्हे (ता. पुरंदर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मिकी विद्यालयामध्ये यावर्षीही नवागतांचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले. विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून बैलगाड्या सजवून आणल्या होत्या. त्यात प्रवेश करणाऱ्या नवागतांना फेटे बांधून पारंपरिक ढोल-लेझीमच्या निनादात या बैलगाड्या विद्यालयात आणण्यात आल्या. त्यानंतर नवागतांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
भोरमधील उत्रौलीत प्रभातफेरी, फुगे अन् गुलाब पुष्प
पुण्यातल्या भोर तालुक्यातील उत्रौली जिल्हापरिषद शाळेत, विध्यार्थ्यांची वाद्याच्या गजरात गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर त्यांचे औक्षण करून फुगे आणि गुलाब पुष्प देत शाळेत पहिल्या दिवशी त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेने विद्यार्थ्यांचे केलेले स्वागत पाहून पालकही भारावून गेले होते. यामुळे जे विद्यार्थी शाळेत पहिल्यांदाच प्रवेश घेत आहेत, त्यांच्या मनातली शाळेबद्दलची भीती निघून गेल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
एसपीएम स्कूलमध्ये ढोल ताशांचा गजर
पुण्यातील एसपीएम स्कूलमध्ये विद्यार्थ्याचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांसाठी स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली. एसपीएम स्कूलमध्ये ढोल ताशांच्या वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. विद्यार्थ्यांनी यावेळी चिअर अप करत शाळेत प्रवेश केला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले.
‘चांगला अभ्यास करून मोठे व्हा आणि आई वडिलांचे नाव मोठे करा’
इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज अचानक येथील भैरवनाथ हायस्कूल येथे उपस्थित राहून विद्यार्थी विद्यार्थिनींचे स्वागत केले त्याचबरोबर पुस्तक वाटप केले. यावेळी त्यांनी मुलांना चांगला अभ्यास करून मोठे व्हा आणि आई वडिलांचे नाव मोठे करा, अशा शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.