मुंबई : पुणे, कोल्हापुरातील शाळा सुरू झाल्या. या विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थी भारावून गेले होते. पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या शाळा आजपासून सुरू झाल्या. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यात शाळेच्या पहिला दिवसाचा उत्साह दिसून आला. पुण्यातल्या भोर तालुक्यातील उत्रौली जिल्हा परिषद शाळेत पहिल्याच दिवसी विद्यार्थ्यांना फेटे बांधून स्वागत करण्यात आले. तसेच ट्रॅक्टरमधून गावातून पारंपरिक वाद्याच्या गजरात प्रभातफेरी काढली. त्यानंतर त्यांचं औक्षण करून फुगे आणि गुलाब पुष्प देत शाळेत पहिल्या दिवशी त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. शाळेने विद्यार्थ्यांचे केलेले स्वागत पाहून विद्यार्थी आणि पालक भारावून गेले होते. यामुळे जे विद्यार्थी शाळेत पहिल्यांदाच प्रवेश घेतायत त्यांच्या मनातली शाळेबद्दलची भीती निघून गेल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरू झाल्या. शाळेचा पहिला दिवस म्हटला की शाळा प्रशासनाच्या वतीने अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात येतं. असच काहीसं स्वागत कोल्हापुरातील वसंतराव चौगुले या इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने करण्यात आले आहे. बँड पथकाच्या गजरात गुलाब पुष्प, कॅडबरी देत आणि औक्षण करत विद्यार्थ्यांचे लक्षवेधी आणि अनोख्या पद्धतीने स्वागत केलं. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळत होता.
विद्यार्थी स्कूल बसमधून उतरताच शालेय विद्यार्थ्यांनी बँड वाजवत स्वागताला सुरुवात केली. पुढे शिक्षकांनी गुलाब पुष्पासह कॅडबरी विद्यार्थ्यांना देत त्यांच गुलाबाच्या पाकळ्या उधळून औक्षणही केला आहे. पापा कहते है बडा नाम करेगा या गाण्यावर वाद्य वाजवून विद्यार्थ्यांनी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा स्वागत हे अनोख्या पद्धतीने झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद बघायला मिळाला.
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील धर्मवीर संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे मातृ पितृ पूजन समारोह हा असा आगळावेगळा कार्यक्रम शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी घेण्यात आला. आपल्या मुलांवर आई-वडिलांप्रती चांगल्या भावना निर्माण व्हाव्यात त्यांच्यावर संस्कार व्हावेत आणि पृथ्वीवरचा देव हा आपल्या आई-वडिलांच्या रूपात विद्यार्थ्यांनी पहावा. यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांचाही मोठा सहभाग दिसून आला.