पुण्यात भारतीय सैन्यातील ब्रिगेडियरची रेल्वेखाली आत्महत्या, नग्न अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ
पुण्यात भारतीय सैन्यात ब्रिगेडियर पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.
पुणे : पुण्यात भारतीय सैन्यात ब्रिगेडियर पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडालीय. या अधिकाऱ्याचं नाव अनंत नाईक असं आहे. ते पुण्यातील एएफएमसीमध्ये (AFMC) ब्रिगेडियर (हेड ऑफ द डिपार्टमेंट, हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन) पदावर कार्यरत होते. विशेष म्हणजे नाईक हे आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या सरकारी गाडीतून पुणे रेल्वे स्टेशन येथे आले होते (Suicide of Senior Indian Army officer brigadier Anant Naik in Pune).
नेमकं काय घडलं?
मृत अनंत नाईक हे भुवनेश्वर येथील रहिवासी आहेत. ते एएफएमसी येथे कार्यरत होते. आज (18 एप्रिल) सकाळी ते चालक बोडके यांच्यासोबत सरकारी गाडीने पुणे रेल्वे स्टेशन येथे आले. चालक बोडके याला मी एमसीओ मधून जाऊन येतो असे सांगून ते पुणे रेल्वे स्टेशनमध्ये गेले. त्यांनी सकाळी 12.15 मिनिटांनी उद्यान एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या इंजिन पुढे येऊन आत्महत्या केली. ही घटना रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर घडली.
मुलाकडून वडिलांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनाची मागणी
मृत ब्रिगेडियर अनंत नाईक यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सुसाईड नोट सापडली नाही. त्यांच्या आत्महत्येबाबतची माहिती त्यांचा मुलगा अभिषेक नाईक याला फोनवर कळवण्यात आली. अभिषेक याने आल्यानंतरच वडिलांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्याची विनंती केली. त्यामुळे अनंत नाईक यांच्या मृतदेहाचं 19 एप्रिल रोजी शवविच्छेदन होणार आहे.
आत्महत्येप्रकरणी एक प्रत्यक्ष साक्षीदार, सीसीटीव्ही फुटेजही मिळालं
ब्रिगेडियर नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे त्याचं नाव संतोष कांबळे असून तो व्यवसायाने पाणी पुरवठ्याचं काम करतो. रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मृत ब्रिगेडियर नाईक हे प्लॅटफॉर्म नंबर एक या ठिकाणी फिरत असताना दिसत आहेत. तसेच त्यांनी चेन्नई एक्सप्रेस खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आलं नाही, असं सीसीटीव्हीत दिसतंय.
घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पुणे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी स्वतः घटनास्थळाला, AFMC office आणि त्यांच्या कार्यालयाला भेट दिली. ते स्वतः या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेही वाचा :
कौटुंबिक आत्महत्यांचं वाढतं सत्र, चिमुकल्याला दोरीला बांधून कोल्हापुरात दाम्पत्याची नदीत उडी
कौटुंबिक कलहाला कंटाळून औरंगाबादेत विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या
व्हिडीओ पाहा :
(Suicide of Senior Indian Army officer brigadier Anant Naik in Pune