संसदेतून राज्यसभेला हद्दपार केलंय का? राज्यसभा अध्यक्षांना निमंत्रण का नाही?; सुप्रिया सुळे यांचा भाजपला सवाल
आजच्या कार्यक्रमाला सर्वच विरोधी पक्ष गेले नाही. जे गेले ते किती मनापासून गेले याचा विचार करा. मी नवीन वास्तू पाहिली नाही. पण मला जुनी वास्तू प्रिय आहे. जुन्या वास्तूच्या भिंती बोलक्या आहेत.
पुणे : नव्या संसदेच्या इमारतीचं उद्घाटन आज पार पडलं. या कार्यक्रमाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित होते. पण राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना निमंत्रणच देण्यात आलं नाही. त्यावरून राष्ट्रादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला फटकारलं आहे. या कार्यक्रमाला लोकसभेच्या अध्यक्षाला बोलावलं. पण राज्यसभा आहे ना संसदेत? राज्यसभेचे अध्यक्ष हे उपराष्ट्रपती आहेत. त्यांनाही बोलावलं नाही. म्हणजे तुम्ही राज्यसभेला हद्दपार केलंय का? संसदेत राज्यसभा नाही का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. ओम बिर्ला यांना बोलावलं याचा आनंद आहे. त्याचं स्वागतच आहे. पण त्याचबरोबर राज्यसभेच्या अध्यक्षांना बोलवायलाच हवं होतं. त्यामुळे हा कार्यक्रम व्यक्तीचा आहे की संसदेचा हे पाहिलं पाहिजे, असा टोलाही सुळे यांनी लगावला.
सुप्रिया सुळे या मीडियाशी संवाद साधत होत्या. त्यावेळी त्यांनी हा सवाल केला. आम्हाला तीन दिवसांपूर्वीच संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा व्हॉट्सअप मेसेज आला. संसद ही देशातली लोकशाहीतील मंदिर आहे. आम्ही सर्व देशासाठी एकत्र आलो असतो तर संयुक्तिक ठरलं असतं. पार्लमेंट चालवायची आणि पार्लमेंटची जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर असते. एरव्ही बिल पास करायचे असतात तेव्हा सर्व मोठे मंत्री, नेते या देशातली विरोधी पक्ष नेत्यांना फोन करतात. एरव्ही तुमचं काम असलं तर मंत्री विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोन करतात ना. मग आता फोन का केला नाही?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
कार्यक्रम अपूर्ण
या सरकारमधील एखाद्या वरिष्ठ नेत्याने किंवा मंत्र्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांना एखादा फोन जरी केला असता तर सर्वजण राजीखुशी गेले असते. संविधानाने देश चालतो आणि लोकशाही असेल तर लोकशाहीत विरोधी पक्ष असलाच पाहिजे. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही तोच आग्रह होता. हे संविधानातही आहे. अशावेळी तर एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नसेल तर कार्यक्रम अपूर्ण आहे, असंही त्या म्हणाल्या.
ते मनापासून गेले नाही
आजच्या कार्यक्रमाला सर्वच विरोधी पक्ष गेले नाही. जे गेले ते किती मनापासून गेले याचा विचार करा. मी नवीन वास्तू पाहिली नाही. पण मला जुनी वास्तू प्रिय आहे. जुन्या वास्तूच्या भिंती बोलक्या आहेत. माझ्यासाठी जुनी वास्तूच मंदिर असेल, असं सांगतानाच कशाचा इव्हेंट करू नका. संसदेचा तर नकोच. कारण ते लोकशाहीचं मंदिर आहे. आमची स्वत:ची ओळख नाही. जनतेमुळेच ओळख आहे, असंही त्यांनी सांगितलं.