बारामती, पुणे : मी नेहमी वास्तवतेबरोबर जगते आणि सध्या वास्तवता काय आहे तर ती महागाई (Inflation) आहे, असे रोखठोक मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केले. यशस्विनी अभियानाअंतर्गत राज्यभरातील महिला बचत गटासाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण बारामतीत पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, की पवार कुटुंबीय नेहमी विकासाच्या मुद्द्यावर भाष्य करते. मात्र राज्यातले राजकारण (Politics) पाहता वेगळ्या दिशेने राजकारण जाते का, असा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला. तुम्ही श्रीलंकेमध्ये काय चालले आहे, हे पाहत आहात. कुणाच्या घरी जाऊन विचारा. त्यांना महत्त्वाचे आव्हान काय आहे. लिंबू, भाजी, फळे आणि सगळेच भाव गगनाला भिडले आहेत. सिलेंडरच्या भावामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. त्यामुळे मी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार, असे त्या म्हणाल्या.
मला अयोध्येला जाण्याचा अजून योग आला नाही. महाराष्ट्र आणि देश समजून घेण्यासाठी मी अनेक ठिकाणी जात असते. अनेक भागातले खासदार, आमदार विकासकामे पाहण्यासाठी एकमेकांच्या मतदारसंघात जात असतात. त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळते. पुढच्या महिन्यात आम्ही केरळला जात आहोत. गेल्या महिन्यात आपल्याकडे खासदार आले होते, तो अभ्यास दौरा होता. राणा प्रकरणावर विचारले असता त्या म्हणाल्या, की महागाई आणि महाराष्ट्रातून आलेल्या महिलांचे ट्रेनिंग यामुळे मी माझ्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे इतर घडामोडींचा विचार करायला मला वेळ नाही.
ओबीसी आरक्षण संदर्भात आज सुप्रीम कोर्टात मध्य प्रदेश सरकारची सुनावणी होणार होती. त्याबाबत विचारले असता मध्यप्रदेश सरकार त्याबाबत निर्णय घेईल. इलेक्शन कमिशन आणि त्यांची स्वतंत्र बॉडी आहे, ते एकत्रित निर्णय घेतील, असे त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी शाळेला भेट देऊन महिलांना मार्गदर्शन केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठानच्या अटल इंक्युबेशन सेंटरमध्ये या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणातून यशस्वी महिला उद्योजक तयार करणे त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देणे हा प्रमुख उद्देश आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. आज काही व्यवसायिक महिला आणि बचत गट महिला एकत्र येऊन व्यवसाय सुरू करत आहेत. त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण हे संस्थेच्या माध्यमातून दिले जात आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, म्हणून हा प्रयत्न केला जात आहे.