Supriya Sule : आम्हाला काही लपवायची गरज नाही, रोहित पवारांना आलेल्या नोटिशीच्या चर्चेला सुप्रिया सुळेंनी दिला पूर्णविराम
रोहित पवार (Rohit Pawar) यांची चौकशी आणि नोटीस तसेच बारामती मतदारसंघ आणि भाजपा, मनसे यांच्या अनुषंगाने प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. चांदणी चौकातील वाहतूककोंडीविषयीही त्यांनी मत व्यक्त केले.
पुणे : आमच्या कुटुंबातील कोणालाही नोटीस आली तरी आमची सहकार्याचीच भूमिका असते, असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. राष्ट्रवादीतर्फे (NCP) आज महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली. पेट्रोल, डिझेल, सीनजी, घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादीने जनआक्रोश आंदोलन केले. घरगुती वापराच्या वस्तूवर लावलेल्या जीएसटीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सरकारचा निषेध केला. पुण्यातील कोथरूड परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांची चौकशी आणि नोटीस तसेच बारामती मतदारसंघ आणि भाजपा, मनसे यांच्या अनुषंगाने प्रतिक्रिया दिली आहे. चांदणी चौकातील वाहतूककोंडीविषयीही त्यांनी मत व्यक्त केले.
‘आम्हाला लपवायची काही गरज नाही’
रोहित पवारांच्या चौकशीविषयी त्यांनी माहिती दिली. रोहित पवार यांची कोणतीही चौकशी सुरू झालेली नाही. अशा बातम्या केवळ माध्यमांमध्ये सुरू आहेत. प्रिलिमिनरी इन्क्वायरी सुरू झाल्याच्या बातम्या येत आहेत. माझे रोहित यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांना अद्याप नोटीस आलेली नाही. पण आमच्यापैकी कोणालाही नोटीस आली तर आमची नेहमी सहकार्याची भूमिका राहिलेली आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला लपवायची काही गरज नाही. त्यामुळे अशी काही चौकशी झाली तर आम्ही उत्तर देऊ, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
‘त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार’
भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणतात एक पार्टी एक देश. आमचे त्याच्या उलट आहे. आम्ही संविधान मानणारे लोक आहोत. एक देश आणि अनेक पक्ष राहिलेच पाहिजेत. त्यामुळे उद्या निर्मला सीतारामन बारामतीत त्यांच्या पक्षाचा प्रचार केला तरी मी त्यांचे स्वागत करेन. त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे. मनसेनेदेखील त्यांचा प्रचार करावा. आम्हाला काहीही अडचण नाही. मला आनंदच होईल. कारण माझे माझ्या मतदारसंघावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे जो लोकप्रतिनिधी या मतदारसंघाला पुढे घेऊन जाईल, त्याला न्याय मिळालाच पाहिजे. म्हणूनच तर संविधान आहे. महत्त्वाचे म्हणजे बारामती सगळ्यांनाच हवीहवीशी आहे. हे याचेच प्रमाणपत्र असल्याचा टोला त्यांनी भाजपा आणि मनसेला लगावला आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
‘इतर कोणते प्रश्न निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्या’
पूल पाडल्यास खरेच सर्व प्रश्न सुटणार आहेत का, याचा विचार सरकार आणि प्रशासनाने करावा, असे मत सुप्रिया सुळे यांनी मांडले आहे. चांदणी चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी तेथील पूल पाडला जाणार आहे. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पूल पाडल्यानंतर इतर कोणते प्रश्न निर्माण होणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.