‘अजितदादा, तुमच्या पाया पडतो, तुमचं काय अडकलं यांच्यापाशी’, सुरेश धसांची भरसभेत आर्जव, काय केले आवाहन
Suresh Dhas on Ajit Pawar : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात पुण्यात प्रचंड जनआक्रोश मोर्चा निघाला. यावेळी धनंजय मुंडे यांना पाठीशी घालू नका, त्यांना मंत्रिमंडळात ठेऊ नका, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात, बीड, परभणीनंतर आज पुण्यात विराट मोर्चा निघाला. या मोर्चात पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार सुरेश धस यांनी नव्याने पुन्हा गौप्यस्फोट केले. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. धनंजय मुंडे यांना पाठीशी घालू नका, त्यांना मंत्रिमंडळात ठेऊ नका, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. खंडणी प्रकरणात धक्कादायक दावा केला. त्यामुळे एकूणच या सर्व प्रकरणाची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक असल्याची चर्चा होत आहे.
वाल्मिक कराडकडे 17 मोबाईल
संतोष देशमुख हत्याप्रकरणासह खंडणीच्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्यावर सुरेश धस चांगलेच बरसले. या आकाकडे 17 मोबाईल असल्याचा दावा त्यांनी केला. वाल्मिक कराड याचा जवळचा नितीन कुलकर्णी हा अचानक गायब झाला आहे. त्याला समोर आणण्याची विनंती धस यांनी केली. वाल्मिक कराड, या आकाच्या खंडणीचे सर्व धागेदोरे या 17 मोबाईलच्या मार्फत, सीडीआरच्या माध्यमातून सहज काढता येतील असा दावा त्यांनी केला. या 17 मोबाईल आणि नितीन कुलकर्णी यांच्याविषयीची माहिती सीआयडी आणि पोलीस अधिक्षकांना दिल्याचे त्यांनी पुण्यातील सभेत सांगितले.
वाल्मिक कराड आत गेल्यापासून नितीन कुलकर्णी गायब झाला आहे. त्याला धरून समोर आणा. त्याच्याकडील 17 मोबाईल जप्त करा. या आकाने कुणा-कुणाकडून किती किती माल जमा केला, त्याची सर्व माहिती समोर येईल असा दावा त्यांनी केला.
अजितदादा तुमच्या पाया पडतो
पुणे जिथे काहीच नाही उणे, या ऐतिहासिक शहरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी याप्रकरणात कोणालाच सोडू नये अशी विनंती त्यांनी केली. अजितदादा हे प्रांजळ मनाचे आहेत. पाच वर्षाच्या लेकरासारखं त्यांचं हृदय आहे. ते कधीच चुकीचे काम करत नाहीत. आपणही 10-11 वर्षे राष्ट्रवादीत अजितदादा यांच्यासोबत काम केले. आपण काही लोकांना घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांच्या कामासाठी संबंधितांना फोनवरून सूचना देण्याची विनंती त्यांना केली होती. पण त्यांनी तसे करण्यास साफ नकार दिल्याचा किस्सा त्यांनी सांगितला.
‘अजितदादा, तुमच्या पाया पडतो, तुमचं काय अडकलं यांच्यापाशी’, अशी आर्जव यावेळी सुरेश धसांनी केली. याला (धनंजय मुंडे) अगोदर बाहेर काढा, असे ते म्हणाले. खंडणीसाठी सातपुडा या सरकारी बंगल्यावर बैठक झाली असे सांगत, हे जर खोटं निघालं तर राजकारण सोडून देऊ असे धस म्हणाले.