नागपुरात 25 दिवसात 72 डेंग्यूच्या रुग्णांची नोंद, तर पुण्यात…; राज्यात साथीच्या आजारांचा फैलाव
राज्यात लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेकांना डेंग्यू, मलेरियाची लागण होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
Viral Fever disease Increase In Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसाचा जोर आता ओसरला आहे. मुसळधार पावसामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. राज्यात लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेकांना डेंग्यू, मलेरियाची लागण होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यातही दमदार पाऊस पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. त्यातच आता रुग्णांना सर्वोत्तम आणि वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष अद्ययावत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्या कक्षात अत्यंत महत्त्वाच्या औषधांचा साठा आणि आपत्कालिन ‘पॅरा मेडिकल टीम देखील सुसज्ज ठेवण्यात आली आहे.
ठाण्यातील सिव्हील रुग्णालयात लेप्टो, डेंग्यू, मलेरिया रुग्णांसाठी जिल्ह्यात पॅरा मेडिकल पथक सज्ज ठेवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे प्रधानमंत्री पीव्हीटीजी विकास मिशन या अभियानांतर्गत आरोग्य आणि पोषणसारख्या मुलभुत सुविधा देण्याबाबत लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात अदिवासी व अतिदुर्गम भागात एक मोबाईल मेडिकल युनिट मुरबाड आणि शहापूर तालुक्यात सुरु आहेत. तर नऊ मोबाईल मेडिकल युनिट 1 ऑगस्टपासून सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून देण्यात आलेली आहे.
पुण्यात पुरानंतर आता साथीचे रोग पसरण्याची भीती
तर दुसरीकडे पुण्यात पुरामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. पुण्यात अनेक नागरिकांच्या घरात पाणी साचले होते. आता पूर ओसरल्याने पाणी ओसरले आहे, पण अनेकांच्या घरात गाळ, चिखल तसाच शिल्लक राहिला आहे. यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे आरोग्य विभागाने विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
वेळीच उपचार घ्या
तसेच नागपूर ग्रामीणमध्ये गेल्या 25 दिवसांत 72 डेंग्यूच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नागपूर शहरात 25 दिवसांत 56 चिकनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. त्यासोबतच नागपुरात लहान मुलांनाही साथीचे आजार होताना दिसत आहे. त्यामुळे लहान मुलांच्या ओपीडीची संख्या वाढली. तसेच मेडिकल, रुग्णालयातही रुग्णांची वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने लक्षणं दिसताच वेळीच उपचार घ्या, असे आवाहन केले आहे.