पुणे : दोन वर्षांपेक्षा जास्त काळ कुत्र्याच्या पिलांच्या सहवासात राहिल्याने मुलगाही श्वानांप्रमाणे (Dogs) वागू लागल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. कोंढवा परिसरातल्या कृष्णाई बिल्डिंगमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. त्याच्या या अवस्थेला त्याचे स्वत:चे बेरोजगार आई-वडीलच जबाबदार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. कोंढवा पोलिसांनी पीडित मुलाच्या पालकांवर बाल संगोपन आणि संरक्षण न्याय (Care and Protection of Children) कायद्यातल्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलीस स्टेशनमधले (Kondhwa Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित लहान मुलाची त्या घरातून सुटका करणे एक आव्हान होते. कारण ती सर्व कुत्री भटकी होती. त्यांची नसबंदी झालेली नव्हती. शिवाय ती केव्हाही हिंस्र रूप धारण करू शकत होती.
‘पुणे मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, अत्यंत घाणीच्या, अस्वच्छतेच्या ठिकाणी तब्बल 22 कुत्र्यांच्या सान्निध्यात हा 11 वर्षांचा लहान मुलगा अडकला होता. प्राण्यांना आणि लहान मुलांना अशा अस्वच्छ स्थितीत ठेवणे हा गुन्हा आहे. मुलाच्या पालकांनी कुत्र्यांना घरात ठेवण्याची परवानगी घेतली होती का, याचा तपास पोलीस करत असून बालकल्याण समितीच्या निर्णयानंतर या जोडप्याला अटक केली जाणार आहे. तर मुलासोबत घरातून रेस्क्यू केलेल्या कुत्र्यांना डॉग शेल्टरमध्ये नेण्यासाठी पोलिसांनी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आहे.
पीडित मुलगा आणि त्याचे पालक कोंढव्यातल्या कृष्णाई बिल्डिंगमधल्या वन बीएचके अपार्टमेंटमध्ये राहत होते. तेथेच हा प्रकार घडला. ही गोष्ट सोसायटीतल्या एका जागरूक रहिवाशाच्या लक्षात अल्यानंतर त्याने चाइल्डलाइन फाउंडेशनला कॉल केला आणि याबाबतची माहिती दिली. या तक्रारीवर कारवाई करून फाउंडेशनशी संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांनी 4 मे रोजी अपार्टमेंटला भेट दिली. मुलाच्या आई-वडिलांची तोंडी कानउघडणी करून समाजसेवक निघून गेले. मात्र दुसऱ्या दिवशी मुलाची प्रकृती पाहण्यासाठी पुन्हा ते संबंधित घरी गेले असता घराला बाहेरून कुलूप लावलेले दिसले. त्यांनी खिडकीतून आतमध्ये पाहिले तेव्हा तो लहान मुलगा कुत्र्यांच्या कळपामध्ये एकटाच बसल्याचे आढळले. त्यानंतर बालकल्याण समितीला याची माहिती देण्यात आली.
या मुलाला अनेक दिवसांपासून योग्य पोषण न मिळाल्याने तो अशक्त झाला आहे. तर त्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे. त्याचे आई-वडील घरी जेवण बनवत नव्हते. त्यांच्या घरी स्वयंपाकासाठी सिलिंडर किंवा इतर कोणतीही व्यवस्था नव्हती, या जोडप्याचा व्यवसाय बंद पडला होता. तेव्हापासून हे दोघे बेरोजगार आहेत. घरामध्ये स्वच्छतेचा प्रचंड अभाव होता. कुत्र्यांनी ठिकठिकाणी घाण केलेली होती. घरातली दोन कुत्रीही मेली होती. तर मुलाला अनेक दिवस अंघोळ घातलेली नव्हती. या सर्वांची दुर्गंधी परिसरात पसरली होती, असे ज्ञान देवी चाइल्डलाइनच्या संचालिका अनुराधा सहस्रबुद्धे म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, की शाळा सुरू झाल्यानंतर या मुलाला शाळेत पाठवले गेले. पण तो कुत्र्यासारखे वागू लागला आणि इतर मुलांना चावू लागला. त्यामुळे पालकांनी त्याला शाळेत पाठवणे बंद करून घरात डांबून ठेवले होते. जेव्हा त्याला या सगळ्यांतून बाहेर काढले गेले तेव्हा तो आकाशाकडे तसेच इतर वस्तूंकडे आश्चर्याने पाहत होता. आम्ही त्याला ससून रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या हा मुलगा कुत्र्यासारखा वागतो आहे. म्हणून त्याला योग्य समुपदेशनाची गरज आहे. मुलाला सांभाळण्यास सक्षम नसलेल्या पालकांकडे आम्ही मुलाला परत देऊ शकत नाही, असे अनुराधा सहस्रबुद्धे यांनी सांगितले आहे.