एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार प्रकरणाला धक्कादायक वळण! दर्शनाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला?
आता आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहेत. संबंधित तरुणीच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या. त्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर येतं आहे.
विनय जगताप, प्रतिनिधी, पुणे : वेल्हे तालुक्यातील राजगड परिसरात एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी झालेली तरुणी दर्शना पवार हिचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यात आता आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहेत. संबंधित तरुणीच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या. त्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर येतं आहे. त्यामुळे पोलिसांकडून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांचा मित्रावर संशय
१२ जूनला दर्शना आणि तिचा मित्र राहुल हे ट्रेकिंगसाठी राजगड किल्ल्यावर आले होते. मात्र तिचा मित्र राहुल हा देखील गायब असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी तपासात सीसीटीव्हीबाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. पोलिसांचा मित्रावर संशय अधिक बळावला आहे.
ट्रेकिंगला गेलेला मित्र घटनेनंतर फरार
मात्र राहुल हांडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातला आहे. दर्शना ही अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रेकिंग गेलेला मित्र घटनेनंतर फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. राहुल हाच मुख्य आरोपी आहे की आणखी त्या तरुणीला कुणी मारले याचा शोध लावणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
एमपीएससीमध्ये पटकावला सहावा क्रमांक
राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत दर्शनाने राज्यात सहावा क्रमांक पटकाविला होता. दर्शना ही सत्कार घेण्यासाठी ९ जून रोजी पुण्यातील स्पॉटलाईट अकॅडमी येथे आली होती. ११ जून सायंकाळी चार वाजेपर्यंत ती आमच्या संपर्कात होती. मात्र १२ रोजी दर्शनाला आम्ही दिवसभर फोन करत होतो, असे कुटुंबीयांनी सांगितले.
मात्र दर्शनाने फोन उचलले नाही. म्हणून कुटुंबीय स्पॉटलाईट अकॅडमी येथे आले. दर्शना ही मित्र राहुल दत्तात्रय हंडोरे याच्यासोबत सिंहगड आणि राजगड याठिकाणी फिरण्यासाठी गेली. मात्र हे दोघेही संपर्कात नाहीत आणि माघारी देखील आलेले नाहीत. म्हणून मुलीच्या वडिलांनी सिंहगड रोड पोलिसात मिसिंगची तक्रार दिली होती.