Pune Cemetery : डिझेल टाकून भर पावसात करावे लागतायत अंत्यसंस्कार; पुण्याच्या भोमाळेतली बिकट परिस्थिती
भोमाळे भोरगिरी परिसरात दरवर्षी 2500 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो. पावसाच्या दिवसात एखादी व्यक्ती मृत झाल्यास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक, ग्रामस्थांना मोठा संघर्ष करावा लागतो. ताडपत्री, छत्र्यांचा आधार घेऊन अंत्यसंस्कार करावे लागतात.
खेड, पुणे : स्मशानभूमी (Cemetery) नसल्याने उघड्यावरच आणि प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. खेडच्या पश्चिम भागात पावसाच्या प्रदेशात असलेल्या भोमाळे गावात अशी प्रतिकूल परिस्थिती आहे. या गावात अजूनपर्यंत स्मशानभूमी नसल्याने वर्षानुवर्षे उघड्यावर सरण रचून अंत्यसंस्कार (Funeral) करावे लागत आहेत. स्मशानभूमीसाठी जागा तर मिळाली, मात्र गावात एकी नसल्याचे प्रश्न प्रलंबित आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात गावातील व्यक्ती मृत झाल्यास त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थांना तसेच नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात (Rainy season) मोठी अडचण या सर्वांसमोर येते. अंत्यसंस्कार करताना अक्षरश: डिझेल टाकून भर पावसात सरण पेटवावे लागत आहे. या बिकट परिस्थितीकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.
तीन गुंठे जागा
भोमाळे गावात स्मशान भूमी आहे. गावातील शेतकऱ्यांनी गावाच्या स्मशान भूमीसाठी तीन गुंठे जागा दिली आहे. सातबारा सदरी त्याची नोंदणी झाली आहे. स्मशान भूमीसाठी निधी सरकार देते, मात्र गावातीलच एका शेतकऱ्याचा विरोध असल्याने स्मशान भूमी बांधण्यास अडचण येत आहे. संबंधित शेतकऱ्याला गावातील ग्रामस्थांनी, राजकीय व्यक्तींनी, ज्येष्ठ ग्रामस्थानी विनंती करूनही त्याचा विरोध कायम आहे.
एका शेतकऱ्याचा विरोध
याबाबत तहसीलदार, प्रांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत ग्रामस्थांनी दाद मागितली आहे. मात्र त्यावरही मार्ग निघत नसल्याने ग्रामस्थांची मोठी पंचाईत झोत आहे. एक शेतकरी अख्या गावाला वेठीस धरत आहे. त्यामुळे गावातील व्यक्ती मृत झाल्यास त्यास उघड्यावर जाळण्याची वेळ ग्रामस्थांवर आहे.
पावसातील संघर्ष
भोमाळे भोरगिरी परिसरात दरवर्षी 2500 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो. पावसाच्या दिवसात एखादी व्यक्ती मृत झाल्यास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक, ग्रामस्थांना मोठा संघर्ष करावा लागतो. ताडपत्री, छत्र्यांचा आधार घेऊन अंत्यसंस्कार करावे लागतात. स्मशान भूमीवरून गावात दोन गट पडले आहेत.
प्रश्न मार्गी लागत नाही
ग्रामसभेत अनेकदा याबाबत चर्चा झाल्या आहेत. स्मशान भूमी बांधण्यासाठी निधी येतो. मात्र बांधकामाच्या वेळी संबंधित शेतकरी हरकत घेत असल्याने हे काम मार्गी लागत नाही. तर दुसरीकडे पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने हा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिला आहे.