अभिजीत पोते, पुणे : संपूर्ण राज्यात गाजलेला म्हाडा, आरोग्य भरती आणि टीईटी परीक्षा घोटाळ्याचा (Exam scam) तपास आता ईडी देखील करणार असल्याची माहिती मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्रे तपासासाठी ईडीने पुणे पोलिसांकडून मागून घेतली आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचा पुढील तपास ईडीकडून होणार आहे. पुणे सायबर पोलिसांनी म्हाडा, आरोग्य आणि टीईटी (TET) परीक्षेच्या संदर्भात झालेला घोटाळा उघडकीस आणला होता. ईडीने पुणे सायबर पोलिसांना पत्र पाठवले होते आणि या प्रकरणी सगळी कागदपत्रे मागवली होती. पुणे सायबर पोलिसांनी तपासाची सर्व कागदपत्रे ईडीकडे (ED) पाठवली असल्याची माहिती देखील आता समोर येत आहे. या सगळ्या प्रकरणी आत्तापर्यंत पुणे पोलिसांनी एकूण 60 जणांना अटक केली असून त्यातील अनेक जण जामिनावर सुटले देखील आहेत.
याप्रकरणी यात अनेक बडे अधिकारी देखील असल्याची माहिती समोर आली होती. तिन्ही परीक्षा भरतीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत आता इडीदेखील या प्रकरणी संपूर्ण चौकशी करणार आहे. पुणे सायबर पोलिसांना आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचे धागेदोरे हाती लागले होते. त्यानंतर टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख याच्यासह इतरांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे.
आरोग्य भरतीतील गट क आणि गट ड च्या परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या घोटाळ्यातील आरोपींचा शोध घेत पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना अटक केली. आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले हे यातील मुख्य आरोपी आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने शिवाजीनगर न्यायालयात तब्बल 3 हजार 800 पानांचे चार्जशीटदेखील दाखल केले होते. याचाही सध्या तपास सुरू आहे. या सर्व प्रकरणांची दखल आता ईडीने घेतली आहे.