Pune Kidney smuggling : बेकायदेशीरपणे काढण्यात आल्या अनेक जणांच्या किडन्या; रुबी हॉल क्लिनिक किडनी तस्करीप्रकरणी धक्कादायक खुलासा
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक किडनी रॅकेट प्रकरणी आतापर्यंत रुबी क्लिनिकमधील 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किडनी रॅकेटप्रकरणी एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला होता, त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला.
पुणे : पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील (Ruby Hall Clinic) किडनी तस्करी ही केवळ एका महिलेपुरती मर्यादित नसून अनेक जणांच्या किडन्या बेकायदेशीरपणे काढल्याचे उघड झाले आहे. रुबी हॉल क्लिनिक प्रत्यारोपण आणि किडनी तस्करी (Kidney smuggling) टोळीचा पर्दाफाश नुकताच झाला होता. कोल्हापूरच्या सारिका सुतार या विधवा महिलेने पुण्यातील पंचतारांकित रूबी हॉल क्लिनिकमधील किडनी तस्करी टोळी प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर आता याप्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती पाहता सध्या या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे. गुन्हे शाखेच्या तपासामध्ये रूबी हॉल क्लिनिकमध्ये फक्त सारिका सुतारच नव्हे तर अनेक जणांच्या किडन्या बेकायदेशीरपणे (Illegally) काढून प्रत्यारोपण करण्यात आल्या, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महिलेवर दबाव
सारिका सुतार या विधवा तसेच अशिक्षित असल्याने त्यांच्यावर हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात येत आहे. किडनी तस्करी प्रकरणात पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकसह इतरही काही पंचतारांकित क्लिनिक्सचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघडकीस येत आहे. पुणे शहरात सर्वात जास्त किडनीची तस्करी रूबी हॉल क्लिनिकमध्ये करण्यात आली, असे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात पीडित सारिका सुतार या विधवा महिलेवर हे प्रकरण मागे घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकण्यात येत आहे.
आतापर्यंत काय घडले?
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक किडनी रॅकेट प्रकरणी आतापर्यंत रुबी क्लिनिकमधील 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किडनी रॅकेटप्रकरणी एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला होता, त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला. रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर ग्रँड परवेज यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कागदपत्रांची खात्री न करता दिशाभूल करून किडनी बदलली गेली, असा आरोप त्यांच्यावर आहे. कोल्हापूरच्या महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिची किडनी काढण्यात आली होती. याप्रकरणी तिने तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला. तर याप्रकरणी ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधीक्षकांवरही कारवाई करण्यात आली होती.