Swine Flu : पुण्यात वाढतेय स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या, 4 दिवसांत 131 रुग्ण! गर्दीत जाणं टाळण्याचं आवाहन
2009च्या स्वाइन फ्लूच्या साथीच्या वेळेप्रमाणे परिस्थिती होणार नाही. मात्र यावर्षीची गंभीर प्रकरणे दुःखदायक आहे. कारण लोक आपला जीव गमावत आहेत. रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांवरही भार पडला आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
पुणे : पुणे महानगरपालिका (PMC) हद्दीत स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या चार दिवसांत 131 नव्या केसेस नोंद झाल्या आहेत. 1 जानेवारीपासून ते 1 ऑगस्टपर्यंत पुणे महापालिकेने 129 रुग्णांची (Patients) नोंद केली होती. 5 ऑगस्टपर्यंत 260 रुग्ण होते. अधिकाऱ्यांनी सांगितले, की संसर्ग होण्याचे प्रमुख कारण म्हणजे गर्दी आणि एकमेकांच्या अधिक संपर्कात येणे होय. ताप आणि श्वास लागणे यासारखी लक्षणे असलेले लोक सध्या 377वर आहेत. 5 ऑगस्टपर्यंत 200 लोक स्वाइन फ्लू (H1N1) संसर्गावर उपचार घेत होते. त्यापैकी 35 संशयित रुग्ण होते तर 165 पॉझिटिव्ह आढळले होते. 1 ऑगस्ट रोजी हॉस्पिटलायझेशनची संख्या 129वर होती, जेव्हा शहरातील हॉस्पिटलमध्ये सुमारे 213 संशयित प्रकरणांसह आठ मृत्यूची नोंद झाली होती. शुक्रवारी म्हणजेच 5 ऑगस्टला पुणे महापालिका हद्दीतील मृत्यूची संख्या 10वर होती.
‘उत्सव काळात संसर्ग वाढण्याची शक्यता’
व्हेंटिलेटर सपोर्टवर असलेल्या H1N1 रुग्णांची संख्याही वाढली आहे, असे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. एक ऑगस्ट रोजी आठ गंभीर रुग्ण होते. 5 ऑगस्टपर्यंत ते 14पर्यंत वाढले होते. ससून जनरल हॉस्पिटल आणि बीजे मेडिकल कॉलेजचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. संजय गायकवाड म्हणाले, की आम्ही H1N1 रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहत आहोत आणि यात तीव्रता देखील जास्त आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत आता केसेस खूप जास्त आहेत. वारी तसेच नागरिकांकडून होणारी गर्दी हे वाढण्याचे प्रमुख कारण असू शकते. आगामी गणेशोत्सव आणि दिवाळी तसेच या वर्षाच्या शेवटीदेखील पुन्हा केसेस वाढण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात आली आहे.
‘2009प्रमाणे स्थिती होणार नाही, पण…’
2009च्या स्वाइन फ्लूच्या साथीच्या वेळेप्रमाणे परिस्थिती होणार नाही. मात्र यावर्षीची गंभीर प्रकरणे दुःखदायक आहे. कारण लोक आपला जीव गमावत आहेत. रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांवरही भार पडला आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. 2009मध्ये, नवीन H1N1 इन्फ्लूएन्झा विषाणूचा उदय झाला. तो 40 वर्षांतील पहिला जागतिक फ्लू साथीचा रोग झाला. याला नंतर 2009चा स्वाइन फ्लू महामारी म्हटले जाईल. त्या वर्षी पुण्यात जवळपास 144 H1N1 मृत्यूची नोंद झाली. 2009 ते 2019 दरम्यान, महाराष्ट्रात 3,600हून अधिक मृत्यू आणि 33,00हून अधिक केसेस नोंदल्या गेल्या. पुणे महापालिकेने या कालावधीत केवळ 6,800हून अधिक केसेस नोंदवल्या.