Khadakwasla dam : पुण्यात पावसाचा जोर ओसरला, आता खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गही थांबवण्यात आला
खडकवासला धरण मागील मंगळवारी सकाळी म्हणजेच 12 जुलै रोजी शंभर टक्के भरले होते. त्यानंतर धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. या दरम्यान धरणातून 3.34 टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले.
पुणे : खडकवासला धरणातून (Khadakwasla dam) पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर आता पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. या पावसामुळे खडकवासला धरण फुल्ल झाले. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. आज सकाळी सहा वाजता विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. खडकवासला धरण मागील आठवड्यातच 100 टक्के भरले. तर धरण परिसरात मागच्या चार ते पाच दिवसांमध्ये मोठा पाऊस (Heavy rain) झाला नाही. या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. त्यामुळे ओढ्याचे पाणी कमी झाले. परिणामी धरणातील येवा बंद झाल्यामुळे विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अधिकच्या पावसानंतर धरणातील विसर्ग 1 हजार 712 क्युसेक (Cusec) होता. तो आज पहाटे पाच वाजता 856 क्युसेक करण्यात आला तर सहा वाजता पूर्ण बंद करण्यात आला.
भरून वाहत होती मुठा नदी
खडकवासला धरण मागील मंगळवारी सकाळी म्हणजेच 12 जुलै रोजी शंभर टक्के भरले होते. त्यानंतर धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. या दरम्यान धरणातून 3.34 टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले. त्यामुळे मुठा नदीही भरभरून वाहत होती. आता आज सकाळी सहा वाजता हा विसर्ग बंद करण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळीत आता एकूण पाणीसाठा 18.89 टीएमसी झाला आहे. पानशेत आणि वरसगाव या धरणांनंतर टेमघर धरणही निम्मे भरले आहे. खडकवासला धरणाच्या परिसरात सहा मिलिमीटर, पानशेत धरण क्षेत्रात 32 मिलिमीटर, वरसगाव 37 आणि टेमघर धरण क्षेत्रात 20 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.
धरणांतील पाण्याची सद्यस्थिती
- चार धरणातील एकूण क्षमता 29.15 (टीएमसी)
- आजचा एकूण उपयुक्त पाणीसाठा 18.89 (टीएमसी)
धरणाचे नाव/एकूण क्षमता (टीएमसीमध्ये)/उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये)/टक्केवारी/मागील 24 तासांतील पाऊस (मिलिमीटरमध्ये)
- खडकवासला – 1.97/1.97/100/6
- पानशेत – 10.65/7.17/67.68/32
- वरसगाव – 12.82/7.81/60.95/37
- टेमघर – 3.71/1.92/51.88/20